मुंबई : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या माध्यमातून धनगर समाजाचे विद्यार्थी प्रतिनिधींनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेतील अडचणी, मर्यादा आणि आवश्यक सुधारणा याबाबत माहिती दिली.
प्रतिनिधींनी योजनेतील प्रति जिल्हा विद्यार्थी संख्येची मर्यादा, वसतिगृह बांधणीसाठी जागा, मागील वर्षांचा निधी वितरीत न होणे आणि वैद्यकीय अभ्यासक्रमातील अर्ज यासंबंधी समस्या मंत्री यांच्यासमोर मांडल्या. मंत्री अतुल सावे यांनी सचिव व उपसचिवांना त्वरित सूचना देऊन लवकरात लवकर सोडवणूक करण्याचे निर्देश दिले असून, सचिव व उपसचिवांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.असे मंचाच्या वतीने सांगण्यात आले.या बैठकीत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे सह मुख्य प्रवक्ते बिरू कोळेकर, दादासाहेब हुलगे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विजय माने, कैलास होळकर आणि आदित्य दातीर उपस्थित होते.
प्रतिनिधींनी मागितलेल्या सुधारणा या प्रकारच्या होत्या – प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांची मर्यादा रद्द करणे, नमूद क्षेत्रातील १ ते ७ किलोमीटर अंतरावरील महाविद्यालयांचा समावेश करणे, व्यावसायिक ७० टक्के व बिगर व्यावसायिक ३० टक्के अटी शिथिल करणे, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांचा निर्णय संचालकांना सोपवणे, पुणे येथील मुलींच्या वसतिगृहात प्रवेश देणे, दुसऱ्या ते पाचव्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, शैक्षणिक वर्ष २०२२–२३, २०२३–२४ व २०२४–२५ चा निधी लवकर वितरित करणे, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाच वर्षांपर्यंत अर्ज सादर करण्याची परवानगी देणे आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पुणे येथील शासकीय दुग्धविकास विभागाची जागा उपलब्ध करणे.
प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या वास्तविक परिस्थितीची माहिती देऊन सुधारणा करण्याची गरज स्पष्ट केली. मंत्री अतुल सावे यांनी विषय गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तपासून योग्य मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
सध्या भटक्या जमाती धनगर प्रवर्गातील विद्यार्थी शैक्षणिक वसतिगृह व आर्थिक सहाय्यापासून वंचित आहेत. योजनेतील मर्यादा दूर करून अधिक विद्यार्थ्यांना संधी दिल्यास ग्रामीण भागातील अनेक मुलांचे शैक्षणिक जीवन बदलू शकते, असे निवेदन प्रतिनिधींनी मंत्र्यासमोर व्यक्त केले.
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने सांगितले की समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील. अधिक माहितीसाठी बिरू कोळेकर ९७६२६४६६६३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचाने केले.