ट्रक टर्मिनल उभारणीची मागणी – शहरातील ट्रक, टॅकर वाहतूकदारांची मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी

09 Oct 2025 17:08:29

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील स्थानिक माल ट्रक व टॅंकर वाहतूकदारांनी शहरात जड वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा राखून ट्रक टर्मिनल स्टेशन उभारावे. या संदर्भात उल्हासनगर ट्रक-टॅंकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष कुलविंदर सिंग बैस यांनी मनपा आयुक्त मनिषा आव्हाळे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

उल्हासनगर शहरात जवळपास साडेदोनशे ते तीनशे जड वाहने नियमित ये-जा करतात. मात्र, या वाहनांसाठी शहरात कायमस्वरूपी पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होतो आहे. शहरात माल पोहोचवणारी वाहने राज्यातील तसेच देशातील विविध शहरांमधून येत असल्याने त्यांना थांबण्यासाठी योग्य जागा नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे .

यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, वाहने अनधिकृत ठिकाणी पार्क केली जात आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून ट्रक पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान विठ्ठलवाडी येथील अम्ब्रोसिया हॉटेलच्या मागे असलेल्या सुमारे आठ एकर जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात ट्रक पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक प्रमोद टाले यांनी महापालिकेच्या महासभेत मांडला होता, अशी माहितीही निवेदनात देण्यात आली. सदर जागा निश्चित करून आम्हाला ट्रक टर्मिनल स्टेशन उभारण्याची परवानगी द्यावी तसेच शहरातील पार्किंगचा मुद्दा निकाली निघेपर्यंत पोलिस वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई थांबण्यााची यावी अशी विनंती करण्यात आली आहे.


Powered By Sangraha 9.0