मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि २०२५ चा आशिया कप विजेता रिंकू सिंग याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला पाच कोटी रुपयांची मागणी करणारे खंडणीचे मेसेज आले होते. हे मेसेज डी कंपनी म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या गँगने केले असल्याचे तपासात दिसून आले आहे, असे मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे.
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान रिंकूच्या प्रमोशनल टीमला पाच कोटी रुपयांची मागणी करणारे तीन खंडणीचे मेसेज मिळाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेस्ट इंडीज, कॅरिबियनमधून मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद या दोन संशयितांना अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात पुढे असे आढळून आले की, याच आरोपीने दिवंगत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीकडून देखील १० कोटी रुपयांची मागणी केली होती. चौकशीदरम्यान, अटक केलेल्या संशयितांपैकी एकाने रिंकू सिंगच्या टीमशी खंडणीसाठी संपर्क साधल्याचेही कबूल केले आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगडचा रहिवासी असलेला रिंकू आयपीएल २०२३ च्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सलग पाच षटकार मारल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला. त्याने २०२४ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध निर्णायक भूमिका बजावली, विजयी धावा फटकावत भारताचे नववे विजेतेपद निश्चित केले.