मुंबई : गुजरातच्या गांधीनगरमध्ये नवरात्रीच्या काळात देहगाम जवळच्या बहियाल गावात आय लव्ह महादेव या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून हिंसा भडकली होती. त्यावेळी धर्मांधांनी पाच दुकाने पेटवली आणि वाहनांवरही हल्ला केल्याचे निदर्शनास आले होते. इतकेच नव्हे तर हिंसेचा परिणाम गावातील गरबा पंडालवर देखील झाला होता. यालाच उत्तर म्हणून गुजरात सरकारद्वारा गुरुवारी मोठ्या प्रमाणावर धर्मांधांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली.
गांधीनगर पोलीस आणि प्रशासनाने गुरुवारी सकाळी बहियाल गावातील अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या आधारे मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे यावेळी पाडण्यात आली. कारवाईदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले होते. बहियाल गावातील हिंसेचे कारण म्हणजे, ‘आय लव्ह मोहम्मद’ या स्टेटसनंतर एका दुकानदाराने ‘आय लव्ह महादेव’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस टाकले आणि त्यानंतरच वाद उसळला.
अशी माहिती आहे की, गांधीनगर पोलीस-प्रशासनाने बहियाल गावात १८६ अवैध व्यावसायिक बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेतली होती. यासाठी २० हून अधिक बुलडोझर वापरण्यात आले. घटनास्थळी ३०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात होते. गुजरातमधील ही बुलडोझर कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वी अहमदाबादमधील चंडोला तलावाजवळील ‘मिनी बांग्लादेश’ परिसरात अशीच कारवाई करण्यात आली होती.
बहियाल हे मुस्लिम बहुल गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार असून त्यापैकी ७० टक्के लोक मुस्लिम आणि उर्वरित हिंदू आहेत. पोलीस तपासात उघड झाले की, हिंदू वस्त्यांमध्येच सर्वाधिक तोडफोड आणि नुकसान झाले होते. उपद्रवींनी खास करून हिंदू बहुल भागांना लक्ष्य केले होते.