स्वतःचे मूलत्व विसरून आपल्या अटी-शर्तींवर ग्राहकाला नमवण्याचे सामर्थ्य जागतिक बाजारपेठेतील शक्तींमध्ये (ग्लोबल मार्केट फोर्सेस) आहे. यंदाच्या उत्सव काळात ही बाह्यशक्ती मोडीत काढण्याचे आवाहन भारतीय म्हणून आपल्यापुढे असेल.
पूर्वी काँग्रेसच्या काळात ‘हिंदी चिनी भाई भाई’चा नारा देताना, हळूहळू चिनी वस्तू बाजारपेठेत घुसवण्याचा प्रयत्न झाला. मग अगदी भारतीय सण ते दैनंदिन जीवनातही चिनी वस्तूंचा पर्याय वाजवी किमतींत पुढे येऊ लागला. या सर्व गोष्टी एका रात्रीत होतात का? तर नाही. त्या वस्तू बाजारात कशा शिरल्या? तर राजकीय, प्रशासकीय पातळीवर घेतल्या निर्णयांतीच हे शक्य होत असते. औषधे, अत्यावश्यक गोष्टी ज्यांचे उत्पादन भारतात होत नाही, अशा गरजेच्या गोष्टींची आयात होते मात्र, ती आवाजवी नसते.
परदेशी वस्तूंची घुसखोरी मोडीत काढण्याची चर्चा आतासारखी पूर्वी का होत नसे? याचे उत्तर पूर्वीच्या सत्ताधार्यांनीच द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती, अर्थात आजही आहे. मागील सरकारांच्या काळात ‘छोटे कुटुंब सुखी’चा नारा देण्यात आला. परिस्थिती बदलत गेली, तशी गावा-खेड्यातील बिर्हाडे विभागली. शहरांतील विभक्त कुटुंबपद्धतीत आईवडील विभक्त आणि लग्नानंतर मुलेही विभक्तच, दिसू लागली. हा बदल वरकरणी समाजसंस्कृती म्हणून वाटत असला, तरीही ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’द्वारे तो ठरवून बिंबवण्यात आलेला नाही का?
पूर्वीच्या काळी एका घरात एकच टीव्ही, किंबहुना त्यापूर्वी संपूर्ण चाळीत एका कुटुंबाकडे टीव्ही अशी स्थिती होती. आज स्थिती काय आहे? विभक्त कुटुंबामुळे दोन चुली झाल्या, दोन स्वतंत्र घरे झाली. अर्थात संसारही स्वतंत्र झाले. त्यामुळेअगदी मिठापासून ते फर्निचरपर्यंत स्वतंत्र खरेदी आलीच. हा विचारही लादला गेला. सिनेमा, टीव्ही मालिका, वृत्तपत्रे, मासिके यातून प्रचार-प्रसार करण्याची, कसर जराही सोडण्यात आली नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, स्वतःला कथित स्त्रीवादी म्हणवून घेणारी मासिके. ज्यात मांडलेले विचार म्हणजे स्त्रियांचे मुक्त विचार, वोकिजम, स्वैर राहणे म्हणजेच कथित फेमिनिजम वगैरे वगैरे पटवून देण्याचा, गेल्या काही दशकांमध्ये झालेला प्रचार.
फॅशन शो, मालिका-सिनेमांतील नायिकांचे प्रतिबिंबातून स्त्रियांच्या मनावर बिंबवण्यात आलेला कथित फेमिनिजम्. त्यानंतर याच पुस्तकांचा आणि सिनेमांच्या आधारे भारतीयांना फेमिनिझम शिकवणारा, तथाकथित वर्ग उभा राहिला. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीने जितकी स्त्रीची, मातृत्वाची पूजा केली, तशी ती जगात कुठेही दिसत नाही. इथे स्त्रीला देवीच्या रूपात पुजले जाते. आजही भारतीय संस्कृतीत स्त्रीवर्गाचे स्थान अबाधित आहे. मेघालय आणि इतर पूर्वोत्तर भारतातील मातृसत्ताक पद्धती याचे उदाहरण ठरावे. वेगळा स्त्रीवाद शिकण्याची गरज, इथल्या जनतेला कधी वाटलीच नाही. तरीही हजारो कोटींचा निधी वर्ग करून, तशी मासिके प्रकाशित करण्यात आली. यातूनच ‘आयडॉल’ उभे करण्यात आले.
प्रामुख्याने ते सरकारविरोधी आंदोलनात उभे राहिले, ज्यामुळे अर्थात त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली. हे सर्व सुरू असतानाच जागतिक बाजारशक्तींनी आपली दुकाने यथावत थाटली. उच्चभ्रू राहणीमानासाठी जे जे लागेल त्या सर्व गोष्टींनी बाजारपेठेत शिरकाव केला. आजघडीला एकट्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची बाजारपेठ १७ हजार कोटी इतकी आहे.
जागतिक बाजारपेठेतील शक्तींद्वारे सरकारेही कोसळू शकतात, अराजकताही माजू शकते, हे बदल तर डोळ्यास न दिसणारे आहेत. या आक्रमणांमुळे अनेकांना देशोधडीला लागण्याची वेळ येते. पूर्वापार चालत आलेले अनेक रोजगार हिरावले जातात.
२०१८च्या दिवाळीत एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात एक ‘अम्मा’ मातीच्या पणत्या विकण्यासाठी बसलेली दिसते. पण, काही केल्या पणत्या विकल्या जात नाही. पण, एक मुलगा तिच्यासाठी एक सुंदर पोस्टर तयार करतो आणि आजूबाजूच्या परिसरात तिच्या व्यवसायाची मार्केटिंग करतो. ‘अम्मा की दिवाली हॅप्पी बनाओ,’ असा त्यावरचा संदेश असतो. ती जाहिरात प्रभाव टाकते आणि त्या ‘अम्मा’कडील सर्व पणत्या विकल्या जातात. खरे म्हणजे ही होती एका कंपनीच्या प्रिंटरची जाहिरात. मात्र ‘व्होकल फॉर लोकल’च्या या जाहिरातीने, तेव्हा सार्यांची मने जिंकली. आज अनेक छोट्या-छोट्या व्यापार्यांच्या भवितव्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. जाहिरात तर विस्मृतीत गेली; पण त्यांचे प्रश्न कायम आहेत.
१२ बलुतेदारीतील कुठले व्यवसाय आज स्थिरस्थावर आहेत? या बाजारपेठांतील आक्रमकांचा फटका त्यांना बसतोच. त्यात अनेकांचा बळी जातो. उदा. एखाद्या उत्पादनात नवे तंत्रज्ञान आले की, परिणामी सर्वच उत्पादकांना त्यात उतरावे लागणार, त्यासाठी वेगळा खर्चही आलाच. या स्पर्धेत उतरण्याच्या नादात अनेक बलाढ्य कंपन्यांचाही बळी गेला आहे. ‘कनेक्टिंग पीपल’ हे ब्रिद असणारी मोबाईल कंपनी, एकेकाळी जगावर राज्य करत होती. मात्र, नव्या अॅण्ड्रॉईड प्रणालीला न स्वीकारल्याने, पुढे काय घडले हे जगाने पाहिले.
काही वर्षांपूर्वी इंटरनेट हे केवळ कार्यालयीन आणि इतर कामकाजासाठी उपलब्ध असायचे.
आता प्रत्येक स्मार्टफोन्समध्ये सोय उपलब्ध झाली. अनेक सोशल मीडिया कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. पुढे क्रिएटर इकोनॉमी तयार झाली. अर्थात त्यातून अनेकांना रोजगार मिळत गेले, ही चांगली बाजू. मात्र, अवाजवी खर्च करण्याचा पायंडाही पडला. परवडत नसेल तरीही नवा मोबाईल, गरज नसेल तरीही नवे वाहन खरेदी करण्याचा अट्टहास, का? त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर टाकून ‘लाईफस्टाईल’ प्रसिद्ध करण्याची हौस! या गोष्टी एकाएकी आल्या नाहीत, तर त्या समाजमनावर रुजवल्या गेल्या. जागतिक बाजारपेठ शक्ती असेच काम करत असतात.
अगदी सोप्यातले सोप्पे उदाहरण म्हणजे, तर काही महिन्यांपूर्वी तयार झालेला ‘लबूबू’ या बाहुलीचा ट्रेण्ड. चिनी कंपनी ‘पॉप मार्टने’ या ‘लबूबू’ला प्रकाशझोतात आणले. भारतातल्या गल्लीबोळात ‘जेन-झी’ तरुणाईने या बाहुलीला डोक्यावर घेतले. तीन हजारांपासून ९.१५ लाखांपर्यंत या बाहुलीची किंमत आहे. गेल्या वर्षभरात ‘लबूबू’च्या कंपनीला पाच हजार कोटींहून अधिक नफा झाला. नकळत भारतीय तरुणांनी हा सर्व पैसा चीनच्या कंपनीला दिला. आता यावर किमान चर्चा होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी काल दि. ८ ऑक्टोबर रोजी ‘झोहो’ या भारतीय कंपनीचाच ई-मेल यापुढे वापरणार असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनीही अशीच माहिती दिली होती. स्वदेशीचा आग्रह शासकीय पातळीवर होत आहेच, पण, आता एका जनआंदोलनातून ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’चा कांगावा ओळखण्याची गरज आहे.