‘नोबेल’ पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या शुक्रवारी शांततेसाठी कार्य करणार्यांना हा पुरस्कार जाहीर होणार आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चाललेली धडपड सगळे जगच जाणून आहे. मात्र, इस्रायल-हमासमधील शांती करार यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या सगळ्या परिस्थितीचा घेतलेला आढावा...
या आठवड्यात शुक्रवारी ‘नोबेल शांतता पुरस्कार’ जाहीर होणार आहेत. या पुरस्काराचे स्वयंघोषित दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळणार का? याबाबत जगभरातच उत्सुकता आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांनी जगभरातील सात युद्धे थांबवली असून, इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धविराम यशस्वी झाल्यास, ते ट्रम्प यांच्या दृष्टीने सर्वांत मोठे यश असेल. दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या नृशंस हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाली. त्याला उत्तर देण्यासाठी, इस्रायलने सुरू केलेल्या युद्धालाही लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील.
दि. ७ ऑक्टोबर रोजीच्या हल्ल्यामध्ये सुमारे १ हजार, २०० इस्रायली नागरिक मारले गेले, तर गेल्या दोन वर्षांतील युद्धामध्ये इस्रायली सैन्य दलांतील १ हजार, १५२ लोक मारले गेले. ‘हमास’च्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या युद्धामध्ये आतापर्यंत ६७ हजारांहून जास्त पॅलेस्टिनी लोक मारले गेले असून, ‘हमास’ त्यांच्यापैकी दहशतवाद्यांची संख्या किती हे स्पष्ट करत नाही. इस्रायली अंदाजानुसार ‘हमास’च्या २५ ते ३० हजार दहशतवाद्यांपैकी, १७ ते २३ हजार दहशतवादी या युद्धामध्ये मारले गेले आहेत.
युरोप आणि अमेरिकेतील डाव्या-उदारमतवादी लोकांमधील युद्धविरोधी वातावरण आणि त्याला कतारसारख्या देशाच्या माध्यमे आणि पैशांची जोड, यांमुळे अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये इस्रायलविरोधी वातावरण निर्माण झाले. त्यातूनच दहशतवादाचा सामना करणार्या इस्रायललाच दहशतवादी ठरवून, जगात एकटे पाडण्याचे प्रयत्नही सुरू झाले. यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देऊन, इस्रायलवर दबाव टाकला.
त्याचा या युद्धावर काहीही परिणाम झाला नसला, तरी या देशांमध्ये इस्रायलविरोधी मोर्चांना हिंसक वळण लागले. त्यात तेथील ज्यू लोकांची दुकाने आणि संस्थांच्या मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले.
नुकतेच ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश येऊन, इस्रायलने गाझा पट्टीतील आक्रमण थांबवले. ‘हमास’ने आपल्या ताब्यातील इस्रायली बंधक सोडण्याचीही तयारी दाखवली. ‘हमास’च्या ताब्यात अजूनही ४८ इस्रायली बंधक असून, त्यातील अनेकजण मृत पावले असण्याचा अंदाज आहे. ‘हमास’ने सर्व बंधक सोडल्यास, इस्रायल जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले २५० आणि युद्धादरम्यान पकडण्यात आलेल्या १ हजार, ७०० पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करेल.
‘हमास’ने परत केलेल्या प्रत्येक इस्रायली नागरिकांच्या बदल्यात, इस्रायल १५ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचे मृतदेह परत करेल. ‘हमास’ने इस्रायली बंधक सोडण्याची तसेच, गाझापट्टीचे प्रशासन तज्ज्ञांच्या प्राधिकरणाकडे सोपवण्यास तयारी दाखवली असली, तरी निशस्त्रीकरण आणि गाझा पट्टी सोडण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ‘हमास’ला ट्रम्प यांच्या प्रस्तावातील अनेक मुद्द्यांवर तांत्रिक मतभेद असून, त्यासाठी इजिप्तची राजधानी कैरोमध्ये चर्चेची फेरी पार पडणार आहे. ट्रम्प यांनी सूचना केली आहे की, वाटाघाटींची पहिली फेरी आठवडाभराच्या आत संपवा. ‘हमास’ शांतता चर्चेबाबत गंभीर आहे का, केवळ वेळ काढण्याचे धोरण अवलंबतो आहे हे अजून स्पष्ट नाही.
इस्रायलच्या राजकारणातही नेतान्याहूंच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकार्यांना, ‘हमास’च्या प्रामाणिकपणाबद्दल शंका आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने त्यांचे जावई जारेड कुशनर आणि पश्चिम आशियासाठी त्यांचे दूत स्टीव्ह व्हिटकॉफ कैरोमधील वाटाघाटींमध्ये सहभागी होणार असून, इस्रायलतर्फे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि इस्रायलचे अमेरिकेतील माजी राजदूत रॉन डर्मर सहभागी होणार आहेत. गाझापट्टीमध्ये युद्धविरामासाठी अनेक महिन्यांपासून वाटाघाटी सुरू असल्या, तरी त्यांना यश येत नव्हते.
इस्रायलने जून २०२५ साली झालेल्या या युद्धामध्ये, इराणच्या नेतृत्वाची संपूर्ण फळी कापून काढली आणि इराणने केलेले क्षेपणास्त्रे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावल्यानंतर, ‘हमास’चा आत्मविश्वास डळमळीत झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या साहाय्याने गाझापट्टीमध्ये अन्नधान्य पोहोचत नसून त्यामुळे होणार्या कुपोषणात हजारो लोक बळी पडण्याची भीती आहे, असे चित्र निर्माण करून, इस्रायलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, इस्रायलने त्याला दाद दिली नाही. ‘हमास’चे उरलेले दहशतवादी तसेच, त्यांचे वरिष्ठ अधिकारी गाझापट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के लोकसंख्या असलेल्या गाझा सिटीमध्ये दडले आहेत.
इस्रायलने गाझा सिटीमध्ये कारवाई सुरू केल्यामुळे, त्यांच्याही अस्तित्वाची लढाई सुरू झाली. कतारने युद्धामध्ये मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने, ‘हमास’च्या राजकीय नेतृत्वाला आपल्याकडे आसरा दिला आहे. ‘हमास’चे नेते कतारमध्ये बसून इस्रायलविरुद्ध हल्ल्यांची योजना बनवतात, या भावनेतून इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे ‘हमास’चे महत्त्वाचे नेते जिथे राहतात, त्या इमारतीवरच हवाई हल्ले केले. कतार हा अमेरिकेच्या अत्यंत जवळचा देश असून, अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा तळ अल-उदेद कतारमध्येच आहे.
नैसर्गिक वायू आणि अल जझीरा ही कतारची शक्तिस्थाने असून, अमेरिकेच्या सरकारमधील अनेक उच्चपदस्थांना त्यांच्या नियुक्तीपूर्वी कतारने सल्लागार म्हणून पगारावर ठेवले होते. इस्रायलने दोहामधील ‘हमास’च्या नेत्यांवर हवाई हल्ले करण्यापूर्वी काही मिनिटे आधी अमेरिकेला सूचित केले. ट्रम्प यांनी तातडीने कतारला कळवण्याचा प्रयत्न केला पण, तोपर्यंत हल्ला होऊन गेला होता. यातून संपूर्ण आखातामध्येच खळबळ उडाली. अरब देशांनी एकत्र येऊन, ‘नाटो’प्रमाणे एक सुरक्षा गट स्थापण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.
सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत युद्धप्रसंगी एकमेकांचे संरक्षण करण्याबाबतचा करार केला. जर इस्रायलने जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडील जुडिया आणि समारिया हे भाग स्वतःच्या देशाला जोडले, तर आपण अब्राहम करारातून बाहेर पडू अशी संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारनेही धमकी दिली. अर्थात असे करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे इस्रायलने आधीच स्पष्ट केले आहे. पण, या घडामोडींमुळे गाझापट्टीमध्ये तातडीने युद्धविराम घडवून आणण्यासाठी अमेरिकेवर दबाव आला.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक परिषदेनिमित्त जागतिक नेते न्यूयॉर्कला जाणार असल्याने, विविध स्तरांवर युद्धविरामाबाबत चर्चेसाठी चांगली संधी उपलब्ध झाली होती.
नवीन योजना सादर करण्यासाठी, आतापर्यंत झालेल्या वाटाघाटींतील सहभागी देशांनी पुढे केलेले मुद्दे एकत्र मांडले गेले. ‘हमास’ निशस्त्रीकरणासाठी तसेच, गाझातून बाहेर पडण्यासाठी अजूनही तयार नाही, तर नेतान्याहू युद्धविराम प्रस्तावात पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच, पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे गाझापट्टीचे प्रशासन सोपवण्यास तयार नाहीत. गाझापट्टीमध्ये सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक इमारतींचे नुकसान झाले असल्यामुळे, तेथील जवळपास २० लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी नवीन घरे उभारावी लागतील. पुनर्विकास होईपर्यंत तेथील लोकांना शरणार्थी म्हणून स्वीकारण्यासही, इस्रायलचे शेजारी अरब देश तयार नाहीत.
इस्रायलने आपल्यावर केलेल्या हल्ल्यासाठी माफी मागायला हवी, अशी कतारची भूमिका होती. पण, लवकरात लवकर युद्ध थांबायला हवे अशी अरब देशांचीही भूमिका होती. न्यूयॉर्कमध्ये विविध स्तरांवर बैठका पार पडत होत्या, युद्धविरामाच्या अटीशर्ती बदलत होत्या. ट्रम्प आणि तुर्कीएचे अध्यक्ष एर्दोगान यांच्या भेटीत युद्धविरामाबाबत प्रस्ताव तयार होत असल्याची घोषणा झाली. ट्रम्प आणि नेतान्याहूंच्या बैठकीत या प्रस्तावावर नेतान्याहूंना सोबत घेण्यात, ट्रम्प यांना यश मिळाले.
ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ आणि लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्यासोबत झालेल्या भेटीत पाकिस्तानची सहमतीही मिळवली. ट्रम्प यांच्या प्रस्तावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वागत केले. आता हे युद्ध थांबून पश्चिम आशियात एक नवीन पहाट उजाडणार का आणि असे झाल्यास, ट्रम्प यांना ‘नोबेल शांतता’ पारितोषिक मिळणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.