सह्याद्रीचा व्याघ्र रक्षक

09 Oct 2025 13:44:44

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणाच्या कामात हिरिरीने सहभागी घेऊन व्याघ्र रक्षणाचा विडा उचलेले वनपाल सुरेश बाबूराव चरापले यांच्याविषयी...

सुरेश चरापले यांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९८६ रोजी, राधानगरी तालुक्यातील कौलव या छोट्या खेडेगावात झाला. त्यांचे वडील शेतकरी, तर घरची परिस्थितीत सर्वसामान्य. शालेय शिक्षण हे गावातच झाले, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेमधून करवीर तालुक्यात झाले. चरापले यांना तशी निसर्गाची फार आवड नव्हती. चुलते पोलीस दलात सेवेत असल्याने, बारावीनंतर त्यांनी सुरेश यांना वनरक्षकांच्या भरतीत जाण्याचा सल्ला दिला. तो सल्ला सुरेश यांनी ऐकला आणि २००६ सालच्या भरतीत त्यांची वनरक्षकपदासाठी निवड झाली.

वनविभागात रुजू झाल्यावर त्यांनी कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांची पहिली नियुक्ती सातार्‍याच्या ढेबेवाडी वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात झाली. त्यावेळी या कार्यालयातील लिपिकाची नुकतीच बदली झाली होती. त्यामुळे ही जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल निकम यांनी चरापले यांच्यावरच सोपवली. या कामकामाजातील बारकावेही त्यांनी चरापले यांना शिकवले. साप्ताहिक दिवसात चरापले कार्यालयीन कामात व्यस्त असले, तरीही ते सुट्टीच्या दिवसात घरी जाण्यापेक्षा वनपालांसोबत गस्तीवर जाऊन, क्षेत्रीय कामांचे बारकावे शिकत. यामुळेच त्यांचा पाया घट्ट झाला. म्हणूनच चरापले ढेबेवाडीच्या कार्यकाळाला वन शिक्षणाचे माहेरघर म्हणतात.

तीन वर्षांनंतर त्यांची बदली कोल्हापूरच्या फिरते पथक विभागात झाली. अवैध कामांवर करडी नजर ठेवण्याचे काम, या पथकाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे चरापले यांना याठिकाणी वन गुन्ह्यांचे प्रकार, त्याविरोधातली कारवाई याविषयी शिकता आले. वन गुन्ह्यांमधील बारकावे टिपता आले. यादरम्यान त्यांनी वनक्षेत्रात अवैधरित्या वावरणार्‍या आणि विनापरवाना लाकडाची वाहतूक करणार्‍या अनेक वाहनांवर गुन्हे दाखल केले. बदलीप्रमाणे चरापले यांच्या अनुभवात वाढ होत होती. निरनिराळ्या आव्हानात्मक परिस्थितींना कशा प्रकारे सामोरे जावे, याचा अंदाज येत होता.

फिरत्या पथकानंतर त्यांची बदली करवीर वनपरिक्षेत्रात म्हणजे, कोल्हापूर शहरात झाली. शहरात वन आणि वन्यजीवांसंबंधी काय काम असते, असा समज बर्‍याच जणांना असतो. मात्र, शहरी अधिवासातच चरापले यांना वन्यजीवांसंबंधीही काम करण्याची संधी मिळाली. शहरात अनेक जखमी पक्षी, माकडे यांचा बचाव करण्याचे काम चरापले करायचे. याशिवाय २० ते २५ अवैधरित्या वावरणार्‍या वाहनांवरदेखील त्यांनी कारवाई केली. पुढे त्यांची बदली करवीरमधीलच नियतक्षेत्र शिये येथे आणि त्यानंतर आंबा येथे झाली.

कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या सीमेवर असणारे आंबा हे गाव तसे निसर्गसंपन्न. मात्र, त्याकाळी आंबा हे प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत यायचे. या गावातील मुख्य महामार्गावरील तपासणी नाक्यावरच चरापले यांची बदली झाली. येथील निसर्गसौंदर्यामुळे चरापले आपल्या कुटुंबासोबत त्याठिकाणीच राहू लागले. तपासणी नाक्यावरचे काम संपल्यानंतर जंगल फिरू लागले. त्याठिकाणी असणारी वन्यजीव संपदा आणि पर्यटकांचा ओघ पाहता, त्यांना आंबा हे क्षेत्र वन्यजीव वनपरिक्षेत्र म्हणून रिते व्हावे, असे वाटत होते.

२०१८ साली नाक्यावर काम करत असताना, एके रात्री एका दाम्पत्याने त्यांना तपासणी नाक्यावरच गाठले. घाटाच्या तोंडावर आम्ही रस्ता ओलांडणारा पट्टेरी वाघ पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
चरापले यांनी लगेच दुसर्‍या दिवशी जाऊन, तो भाग पालथा घातला. त्यावेळी त्यांना जमिनीवर मोठे ओरखडेही आढळले. मात्र, त्यावेळी त्यांना वाघाच्या हालचालीच्या चिन्हांसंबंंधी माहिती नव्हती. आता वाघांसाठी काम करत असताना, त्यावेळेचे ओरखडे हे वाघाचेच असल्याचे चरापले ठामपणे सांगतात. आंब्यात काम केल्यानंतर चरापले यांना पदोन्नती मिळाली आणि ते इस्लामपूर वनविभागात वनपाल म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी नुकतीच मानव-बिबट संघर्षाला सुरुवात झाली होती.

यावर उपाय म्हणून चरापले यांनी, प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली. आठवड्यामधील चार दिवस तरी ते शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती आणि गावागावांमध्ये फिरून बिबट्याविषयीचे प्रबोधन करत. संघर्षाच्या परिस्थितीत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन, बिथरलेल्या लोकांना मार्गदर्शन करत. वाळवा तालुक्यात वन्यजीव बचाव कार्यकर्ते आणि संस्था यांच्यासोबत समन्वय साधत, त्यांच्या बैठक घेऊन मुक्तपणे मात्र नियमांचा चौकटीत काम करण्याचा सल्ला देत. यामुळे चरापले यांचा त्या क्षेत्रात दांडगा जनसंर्पक झाला आणि त्यांच्याविषयी सहकार्याची भावना निर्माण झाली.

ऑगस्ट २०२३ साली त्यांची आंबा वन्यजीव वनपरिक्षेत्रात बदली झाली. हे वनपरिक्षेत्र वन्यजीव म्हणून असावे, अशी चरापले यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाली होती. उदगिरीचे जंगल पिंजून काढल्यावर त्यांना या जंगलात वाघ असण्याची शक्यता वाटली. याचदरम्यान दि. १२ डिसेंबर रोजी चांदोली वनपरिक्षेत्रात वाघाच्या पावलांचे ठसे मिळाल्याने, त्यांनी लागलीच कॅमेरा ट्रॅप मागवून घेतले. दि. १८ डिसेंबर रोजी त्यांनी लागलीच वनमजुरांच्या मदतीने, आंबा वनपरिक्षेत्रातील जंगलात कॅमेरे बसवले. त्याच रात्री त्यातील एका कॅमेर्‍यामध्ये वाघाचे छायाचित्रही मिळाले. वाघाचे हे छायाचित्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वर्षांनंतर मिळाले होते.

सध्या चरापले आंबा वनपरिक्षेत्रात वाघांच्या हालचालींच्या नोंदी घेत आहेत. एका प्रसंगी त्यांना वाघाने हुलकावणी दिली असून, त्यांचे व्याघ्र दर्शन हुकले आहे. मात्र, सह्याद्रीत वाघ प्रत्यक्ष समोरासमोर पाहण्याचे स्वप्न अजूनही चरापले उरी बाळगून आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य वनपाल आणि वनरक्षक संघटनेचे कोल्हापूर वनवृत्ताचे अध्यक्ष आहेत. वनात काम करताना, त्यांची विद्यार्थी वृत्ती आजही जागृत असते. पदाने छोट्या असणार्‍या वनमजुरांकडूनही ते बरेच काही शिकतात. सह्याद्रीशी प्रामाणिक असणार्‍या या माणसाला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0