आंबेडकरवादी आहात का?

09 Oct 2025 13:08:01

नुकतेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजप मनुवादी म्हणून त्यांच्याशी समझोता करणार नाही. तसेच, पुरोगामी पक्षाशी युती करण्याचे प्रयत्नही मी केले.” याचाच अर्थ तथागत गौतम बुद्धांच्या स्मृती पुन्हा मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर असू दे की, इंदू मिल प्रकरण असू दे; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींचा गौरव करणे, पक्षाच्या सत्ताकाळात इतर मागासवर्गीय समाजाच्या मोदींना पंतप्रधान, अनुसूचित जमातीच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणे, हा मनुवाद ठरतो, तर वृद्ध शहाबानोला पोटगी मिळू नये, यासाठी समर्थन करणारा, आणीबाणी लादून भारतीयांच्या सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारा, हिंदू महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका असलेले ‘हिंदू कोड बिल’ नाकारणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याला ’जळके घर’ म्हणाले, तो काँग्रेस पक्ष पुरोगामी म्हणायचा का?

प्रकाश आंबेडकर आज जे काही आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच! त्यामुळे त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रति थोडीतरी कृतज्ञता बाळगणे अभिप्रेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात त्यांना विविध स्तरांवर त्रास देणार्‍या राजकीय पक्षांची, पुरोगामी म्हणून भलामण करताना प्रकाश आंबेडकर यांना काहीच वाटत नाही का? राजकीय अपरिहार्यता या एका निकषावर ते काँग्रेस आणि सहयोगी पक्षाशी युती करण्यासाठी धडपडत असतात. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्याने डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये हरवण्यासाठी जंगजंग पछाडले. तसेच कम्युनिस्ट आणि ओवेसींचा एमआयएम हा पक्षसुद्धा पुरोगामी आहे, असे प्रकाश आंबेडकरांचे मत आहे का? दुर्दैवाने तसे असेल, तर त्यांचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी पूर्णतः विसंगत ठरते. तसेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिपूजा आणि घराणेशाहीच्या विरोधातच होते. त्यांचे विचार आणि कृती म्हणजे मानवतेचे तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवादी होणं ही प्रक्रिया म्हणजे, नीतीमान, सामाजिक न्याय आणि विचारबुद्धीतून जन्माला आलेली क्रांती आहे. त्या क्रांतीचा पाया तथागत बुद्धांची सम्यक दृष्टी आहे. भाजपला मनुवादी आणि इतर राजकीय पक्षांना सोईसाठी ‘पुरोगामी‘ म्हणणार्‍या प्रकाश आंबेडकरांकडे ही सम्यक दृष्टी आहे का? आंबेडकराचे वंशज असले, तरी आंबेडकरवादी आहेत का?

मरणार्‍यांची जात शोधणारे


देशात सर्वत्र दलित आणि अल्पसंख्याकांवर दररोज आणि सातत्याने ठरवून अत्याचार होतो का? अर्थातच तसे नाही. मात्र, कोणतीही हिंसक घटना झाली की, त्या घटनेत जातीय कंगोरे शोधत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम, काही लोक करत असतात. नुकतेच रायबरेलीमध्येही हरीओम पासवान नावाच्या युवकाला लोकांनी चोर समजून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मात्र, राहुल गांधींनी या घटनेवरून थेट देशालाच दोष दिला आहे. ते म्हणाले, “देशामध्ये दलित, अल्पसंख्याक आणि गरिबांवरचा अपराध मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वंचित बहुजनासोबतच जास्त हिंसा होते.” खरे हरिओम गावातला नाही आणि रात्रीच्या वेळी गावात का आला? चोर आहे का? या गैरसमजुतीतून त्याला गावकर्‍यांनी मारहाण केली. या गावकार्‍यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? एकट्या निशस्त्र युवकाला मारताना त्यांच्या मनात जराही दया, करूणा दाटून आली नाही का? इतक्या गर्दीत माणुसकी असलेला एकही जण नव्हता का? हे प्रश्न पडणे गरजेचे होते.

असुरक्षितता आणि गावाबद्दलचा मालकी हक्क यामुळे गावात कुणी बाहेरून आले की, लोकांची मानसिकता का बदलते? त्यातून अशा घटना घडतात आणि राजकारणही सुरू होते. रायबरेलीमध्येही हरिओम कोण आहे? त्याची जात कोणती आहे, याबद्दल गावकर्‍यांना माहिती असेल का? तो मागासवर्गीय समाजाचा आहे, म्हणून त्याला मारहाण झाली नव्हती. मात्र, काँग्रेसच्या राहुल गांधींनी हरिओमची जात शोधून काढली. हरिओम अनुसूचित जातीचा होता. त्याच्या जातीचा उल्लेख करून, या घटनेला राजकीय रंग द्यायचा आणि वातावरण तापवण्याचे प्रयत्नही सुरू झाले. या सगळ्यांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचेही कारस्थान सुरू झाले. त्यामुळेच तर राहुल गांधी हे हरिओमची निंदनीय हत्या आणि रोहित वेमुल्लाची आत्महत्या याचा संबंध जोडत आहेत. बिचारा हरिओम जीवानिशी गेला. इकडे राहुल गांधीसारख्यांना हरिओमचा मृत्यू हीसुद्धा राजकीय संधीच वाटते. गुन्हेगारांना तर शिक्षा होईलच पण, हरिओमच्या मृत्यू पश्चात त्याची जात शोधून, त्याच्यासह त्याच्या जातीचा उल्लेख स्वार्थासाठी करणार्‍यांना कोण शिक्षा देणार?
Powered By Sangraha 9.0