मुंबई : सध्याच्या काळात घटस्फोट घेणं हे अगदीच सामान्य असलं, तरी त्याचं सेलिब्रेशन ही थोडी आश्चर्याची बाबच. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ भलताच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याचा घटस्फोट साजरा करताना दिसतो. ज्यात त्याची आई त्याला दुधाने अभिषेक घालत आहे, शिवाय तो १२० ग्रॅम सोन आणि १८ लाख कॅश असा मजकूर लिहिलेला केक देखील कापताना दिसत आहे.
हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. या तरुणाने त्याच्या आयुष्याची नवीन सुरूवात होत आहे हेच दर्शवण्यासाठी कदाचित हे केलं असावं. सोशल मीडियावर आता त्याच्या या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण तरुणाच्या या कृतीवर टीका करत आहेत, तर काहीनीं त्याच्या नवीन सुरूवातीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, “कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, आनंदी आणि स्वतंत्र आहे. माय लाईफ माय रुल्स!”