गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराची तोडफोड; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

08 Oct 2025 13:53:09

मुंबई : गुजरातमधील प्रसिद्ध गिरनार पर्वतावर असलेल्या गोरखनाथ मंदिरात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री तोडफोडीची घटना घडली. चार अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश करून पूजा सामग्री, दानपेटी आणि काच तोडली. विशेष म्हणजे मंदिराचे महंत झोपेत असताना त्यांना त्यांच्या खोलीत बंद करून हे कृत्य केले गेले.

गोरखनाथ मंदिर गिरनार पर्वताच्या एका शिखरावर स्थित आहे. मंदिरात प्रवेश करून अज्ञात व्यक्तींनी संगमरमराच्या मूर्तीची विटंबना केली, काचेच्या दरवाज्याला तसेच इतर पूजन सामग्रीला नुकसान पोहोचवले. या घटनेची माहिती मिळताच जूनागढ पोलिसांनी भवानाथ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी स्थानिक क्राइम ब्रांच, विशेष ऑपरेशन ग्रुप आणि भवानाथ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

मंदिराच्या महंतांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. सदर घटनेने नाथ संप्रदायातील अनुयायांमध्ये तसेच स्थानिक संत समाजात संतापाचे वातावरण आहे.

गुजरात सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, गांधीनगरहून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, तपासाची माहिती मागवली आहे.

गिरनार पर्वत हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून, या प्रकारच्या तोडफोडीमुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिकांची घडलेली घटना नाथ संप्रदायाच्या इतिहासातील एक संवेदनशील व दुःखद क्षण म्हणून नोंदवली जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


Powered By Sangraha 9.0