मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 'मधाचे गाव' या महत्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 'तळवडे' हे राज्यातील ११ वे मधाचे गाव झाल्याची घोषणा नुकतीच राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने केली. रत्नागिरीत वसलेल्या तळवडे गावाला नैसर्गिक विपुलता लाभली आहे. त्यामुळे भौगोलिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे गाव मधमाशी पालन उद्योगासाठी अनुकूल असल्याने तळवडेला मधाचे गाव संकल्पना राबविण्यास मान्यता दिल्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाने म्हटले आहे.
हा उपक्रम तळवडे गावाच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, ग्रामस्थ, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांच्या अॅग्रिकेअर विभागाच्या पुढाकाराने तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. 'मधाचे गाव' या प्रकल्पाद्वारे स्थानिकांना मध उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग व विपणन यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शाश्वत रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.
सद्यस्थितीत तळवडे गावात १२५ मधाच्या पेट्यांद्वारे मध संकलनाचे कार्य सुरु आहे. तसेच ५० शेतकऱ्यांना मधुमाक्षिका पालनाचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामार्फत आतापर्यंत २० किलो मध संकलित करण्यात आला असून 'रुचियाना मध' या ब्रँड अंतर्गत २५० मिली. मधाच्या बाटल्यांची विक्री देखील सुरु झाली आहे व त्याला ग्राहकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे.
मधमाशी पालनातून मध उत्पादन वाढावं आणि त्याचा फायदा शेती उत्पादक, शेतकरी व ग्रामस्थांना व्हावा म्हणून गावात अधिकाधिक मधमाश्या पेट्या ठेवण्याचा पितांबरीचा मानस आहे. तसेच तळवडे गावातील पितांबरी अॅग्रो टूरिजममध्ये येणाऱ्या पर्यटकांना मधुमक्षिका पालनाची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मध संकलन, मधविक्री आणि इतर पूरक व्यवसायातून पंचक्रोशीत रोजगार संधी वाढतील असा विश्वास असल्याचे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.