राज्य उत्पादन शुल्क विभागाची उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई : १७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

08 Oct 2025 17:21:15

उल्हासनगर : परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेल्या विदेशी मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून १७ लाख १० हजार १६० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

६ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाचे निरीक्षक बी.के जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनस चौक उल्हासनगर -४ येथे सापळा रचून छापा टाकला. त्या कारवाईत २ आरोपीच्या ताब्यातून दमन निर्मित आयत विदेशी मद्याच्या १६८ बाटल्या तसेच तीन वाहने एक इंडिका कार एक रिक्षा व एक महिंद्रा पिकप असा एकूण १७ लाख १० हजार १६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुनील बुलानी व कटारिया या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी एका अज्ञात फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हे सर्व मद्य दादरा आणि नगरहवेली व दमान येथे विक्रीसाठी असलेले पण करचुकवेगिरी करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेले असल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे उल्हासनगर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असे विभागाने स्पष्ट केले आहे.


Powered By Sangraha 9.0