सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा निषेध - सामाजिक संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    08-Oct-2025
Total Views |

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी विवेक विचार मंच, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आणि सामाजिक समरसता मंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या वेळी विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे ॲड. कैलास बगनावत, ॲड. श्रीकांत राहुरकर, ॲड. दीपक कर्पे, ॲड. आरती शिंगणे, सामाजिक समरसता मंचाचे मकरंद चांदोडकर तसेच विवेक विचार मंचचे कार्यकर्ते आप्पासाहेब पारधे, संभाजी ढगे, राहुल लाखे, ॲड. राहुल नावंदर, अजय राउत आणि महारुद्र पुरी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने हल्ला केला, ही घटना अत्यंत दुर्दैवी, असंविधानिक आणि निंदनीय आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर हा प्रकार फक्त वैयक्तिक हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला गंभीर आघात करणारा आहे.

यासोबतच निवेदनात नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे काही समाज विघातक घटक जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.