पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया मोबाइल काँग्रेस 2025’ चे उद्घाटन केले; भारताच्या तंत्रज्ञान सामर्थ्याचा जागतिक मंचावर गौरव

08 Oct 2025 17:11:00

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम ‘इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025’ च्या नवव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी देशातील स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेषकांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, भारताचे तांत्रिक भविष्य सक्षम हातांमध्ये आहे.

पंतप्रधान म्हणाले की, इंडिया मोबाइल काँग्रेस आता केवळ मोबाईल किंवा दूरसंचार क्षेत्रापुरते मर्यादित नसून आशियातील सर्वात मोठे डिजिटल तंत्रज्ञान मंच म्हणून उदयास आले आहे. या यशामागे भारताची तंत्रज्ञानप्रेमी वृत्ती, युवा नेतृत्व आणि देशातील प्रतिभावान नवोन्मेषकांचा मोठा वाटा आहे. सरकारच्या पाठबळाने देशातील स्टार्टअप्सनी नवकल्पना आणि संशोधनाला नवी दिशा दिली आहे. ५जी, ६जी, प्रगत ऑप्टिकल कम्युनिकेशन आणि टेराहर्ट्झ तंत्रज्ञानासाठी प्रयोग केंद्रे स्थापन करून स्टार्टअप्सना वित्तपुरवठा केला जात आहे, तसेच प्रमुख संशोधन संस्थांशी भागीदारी सुलभ केली गेली आहे. या माध्यमातून भारत संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात जगात आपले स्थान मजबूत करत आहे.

पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा उल्लेख करत सांगितले की, “जेव्हा काही वर्षांपूर्वी भारताच्या उत्पादन क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते, आज तोच देश प्रत्येक जिल्ह्यात 5G कव्हरेजसह जगातील सर्वात मोठ्या दूरसंचार बाजारपेठांपैकी एक बनला आहे.” 2014 नंतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहापट वाढ, मोबाईल निर्मितीत 28 पट वाढ आणि निर्यातीत 127 पट वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने अलीकडेच ‘मेड इन इंडिया ४जी स्टॅक’ सादर करून तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे भारत जगातील अशा पाच देशांपैकी एक बनला आहे ज्यांच्याकडे पूर्णपणे स्वदेशी दूरसंचार संरचना आहे. या माध्यमातून देशात हाय-स्पीड इंटरनेट आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीसाठी नव्या ‘दूरसंचार अधिनियम’ चा उल्लेख करत सांगितले की, यामुळे परवाने देणे आणि पायाभूत सुविधांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. परिणामी फायबर आणि टॉवर नेटवर्कचा विस्तार वेगाने होत असून, उद्योगांना गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित डिजिटल वातावरणावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, सायबर सुरक्षा आणि फसवणुकीविरोधी कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत, ज्याचा फायदा ग्राहक आणि उद्योग या दोघांनाही होत आहे. भारत आता सेमीकंडक्टर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सेंटर क्षेत्रात जागतिक भागीदार बनत आहे. देशभरात सध्या १० सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भारताला “जागतिक डेटा केंद्राचे भविष्य” म्हणत सांगितले की, डेटा साठवणूक आणि सुरक्षा क्षेत्रात भारत मोठ्या संधी निर्माण करत आहे.


Powered By Sangraha 9.0