कल्याणमधील ओरॅंगुटॅन इंडोनेशियाला जाण्यासाठी सक्षम ; 'जीझेडआरआरसी'ची 'डब्लूसीसीबी'ला माहिती

08 Oct 2025 14:24:58

मुंबई :
नोव्हेंबर, २०२४ मध्ये कल्याणमधील वन्यजीव तस्करीच्या प्रकरणामधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला इंडोनेशियात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सध्या या प्राण्याचा ताबा असणाऱ्या जामनगरच्या 'ग्रीन्स झूलाॅजिकल, रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेन्टर'ने (जीझेडआरआरसी) 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा'ला (डब्लूसीसीबी) पत्र लिहिले आहे. या पत्रात 'जीझेडआरआरसी'ने ओरॅंगुटॅन सुदृढ झाला असून त्याला पुन्हा इंडोनेशियामध्ये पाठवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती 'डब्लूसीसीबी'कडे केली आहे.

वन विभागाने ९ नोव्हेंबर रोजी पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती. कल्याण-शिळ फाट्यावरील एक्स्पिरिया मॉलजवळील पलवा सिटीमधील सवरना इमारतीतील एका खोलीवर टाकलेल्या छाप्यात काही विदेशी प्राणी आढळून आले. विदेशी साप, अजगर, कासव, सरडा आणि महत्वाचे म्हणजे ओरॅंगुटॅन या प्रजातीचे माकड वनकर्मचाऱ्यांनी यावेळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या सर्व प्राण्यांची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली होती. यामधील ओरॅंगुटॅन या प्रजातीचे माकड जामनगरच्या 'जीझेडआरआरसी' संस्थेकडे पुढील देखभालीसाठी पाठविण्यात आले होते. ही संस्था 'वनतारा'शी संबंधित असल्याने त्यावेळी अनेक वन्यजीवप्रेमी आणि मानद वन्यजीव रक्षकांनी ओरॅंगुटॅनला 'जीझेडआरआरसी'कडे पाठविण्यासाठी विरोध दर्शवला होता. 'जीझेडआरआरसी'कडून हे माकड पुन्हा मूळ देशात पाठवले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आता 'जीझेडआरआरसी'कडून या माकडाच्या प्रत्यावर्तनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

'जीझेडआरआरसी'चे संचालक डाॅ. ब्रिज किशोर गुप्ता यांनी 'डब्लूसीसीबी'ला ३ आॅक्टोबर रोजी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ओरॅंगुटॅनच्या पिल्लाची प्रकृती आता ठीक असून तो प्रत्यावर्तन करण्यासाठी सुदृढ आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या माकडाच्या प्रत्यावर्तनाच्या पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहोत." त्यामुळे 'जीझेडआरआरसी' आता या माकडाच्या इंडोनेशियाच्या प्रत्यावर्तनासाठी तयार असल्याचे, समजते आहे. याविषयी 'डब्लूसीसीबी'चे प्रादेशिक उप-संचालक योगेश वरकड यांनी सांगितले की, "आमचे कार्यायल आॅरॅंगुटॅनच्या प्रत्यावर्तनाच्या प्रक्रियेला सुरुवात करत आहे. हा प्राणी इंडोनेशियातील संबंधित प्राधिकरणाकडे सोपवला जाईल. ते प्राधिकरण त्याला कुठे सोडायचे याविषयीच निर्णय घेईल."



Powered By Sangraha 9.0