नवी मुंबई : "मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाल्याने शहराच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागला आहे. तसेच, मुंबईला आता पूर्णपणे भूमिगत मेट्रो मिळाली असून त्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत होईल. आजचा कार्यक्रम भारताच्या विकास प्रवासातील गती आणि आत्मविश्वास दर्शवतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विकसित भारताच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे.", असे गौरवोद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार,दि.८ रोजी महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३च्या टप्पा २ ब (आचार्य अत्रे चौक ते कफ परेड), मुंबई वन कार्ड लॉन्च, तसेच कौशल्य विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रमांचे उद्घाटन केले. तसेच विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि जनतेस समर्पण केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय नागरी हवाई उड्डयन मंत्री राममोहन नायडू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय हवाई उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह राज्यातील इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, हे विमानतळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरोप आणि मध्यपूर्वेतील सुपरमार्केट्सशी जोडेल. त्यामुळे फळे, भाज्या, मत्स्यउत्पादने यांसारखी ताजी उत्पादने थेट जागतिक बाजारात पोहोचू शकतील. या विमानतळामुळे स्थानिक लघु आणि मध्यम उद्योगांचे निर्यात खर्च कमी होतील, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नव्या उद्योगांना वाव मिळेल. आज संपूर्ण राष्ट्र ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध आहे. असा भारत जिथे वेग आणि प्रगती दोन्ही आहेत.अशा प्रगतीमुळे भारताच्या तरुणांच्या आकांक्षांना नवे पंख मिळतात, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा वंदे भारत सेमी-हायस्पीड गाड्या रेल्वे मार्गांवर धावताना दिसतात, जेव्हा बुलेट ट्रेन प्रकल्पांना वेग येतो, जेव्हा विस्तीर्ण महामार्ग आणि एक्सप्रेसवे नव्या शहरांना जोडतात, जेव्हा पर्वतांमधून लांब बोगदे खोदले जातात आणि समुद्रावर भव्य पूल उभे राहतात. तेव्हा भारताचा वेग आणि प्रगती सर्वांना जाणवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,"आजचा कार्यक्रम भारताच्या विकास प्रवासातील गती आणि आत्मविश्वास दर्शवतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विकसित भारताच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधण्यात आलेला हा विमानतळ कमळाच्या आकारात आहे, जो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे."
“मेट्रो प्रकल्प थांबवणाऱ्यांचे पाप उघड झाले” : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण करताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आज सुरु होणारी मेट्रो लाईन काही लोकांच्या कारभाराची आठवण करून देते. मी स्वतः या प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी उपस्थित होतो. त्यावेळी लाखो मुंबईकरांच्या मनात आशा निर्माण झाली होती की त्यांच्या अडचणी कमी होतील. पण त्यानंतर काही काळ सत्तेवर आलेल्या काही लोकांनी हे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली, पण देशाला हजारो कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आणि मुंबईकरांना वर्षानुवर्षे गैरसोयीचा सामना करावा लागला.” मोदी पुढे म्हणाले, “आज ही मेट्रो लाईन पूर्ण झाल्याने दोन ते अडीच तासांचा प्रवास आता केवळ ३० ते ४० मिनिटांत होणार आहे. ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्त्व आहे, तिथे नागरिकांना तीन-चार वर्षे या सुविधेपासून वंचित ठेवणे हे काही पापापेक्षा कमी नाही.”
“काँग्रेसच्या दुर्बलतेने देशाची सुरक्षा धोक्यात आली” – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, कारण ती भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वात जीवंत शहर आहे. पण त्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने दुर्बलतेचा संदेश दिला आणि दहशतवादासमोर झुकले. मोदींनी एका माजी काँग्रेस गृहमंत्र्याच्या अलीकडील खुलाशाचा उल्लेख करत सांगितले की, “परदेशी दबावाखाली भारताच्या सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून का थांबवले गेले? देशाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.” ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या या कमजोरीमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले आणि देशाला वारंवार जीवितहानी सहन करावी लागली. आजचा भारत मात्र शक्तिशाली आहे. तो घरात शिरून प्रत्युत्तर देतो. हे जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाहिले आणि भारताच्या सामर्थ्याचा अभिमान बाळगला.”
लोकनेते डी. बी. पाटील यांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकनेते दि. बा. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी समाज आणि शेतकऱ्यांच्या सेवेतील त्यांच्या अखंड योगदानाचे स्मरण केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकनेते पाटील यांची सेवेची भावना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे जीवन सार्वजनिक कार्य करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.
नव्या विमानतळामुळे महाराष्ट्राचा १% जीडीपी वाढणार : मुख्यमंत्री फडणवीस
आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जे बोलले जाते, त्याचे प्रत्यक्ष लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. हे विमानतळ नव भारताचे प्रतीक आहे. ९० च्या दशकात विमानतळाची संकल्पना होती, पण काम फक्त एका बोर्डापर्यंत मर्यादित होते. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना या प्रकल्पाचा आढावा घेण्याची विनंती केली. तेव्हा मोदींनी ‘प्रगती’अंतर्गत हा प्रकल्प घेतला. या प्रकल्पाच्या ८ एनओसी अडकल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी पहिल्याच बैठकीत त्यापैकी सात एनओसी मिळवून दिल्या आणि १५ व्या दिवशी आठवी एनओसीही प्राप्त झाली. जे काम गेल्या १० वर्षांत झाले नाही, ते मोदींच्या एका बैठकीमुळे पूर्ण झाले. हा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्बल आहे, कारण यासाठी मोठा पहाड (टेकडी) हटवावा लागला आणि नदीचा प्रवाहही बदलावा लागला. त्यातून सुंदर एअरपोर्ट सुरू झाला. हा भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा एक एअरपोर्ट आहे, त्यातून एक टक्का महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे. वॉटर टॅक्सी इथे असेल. त्यातून गेटवेला जाता येणार आहे. पुढे चौथ्या मुंबई विषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही.
महाराष्ट्राचा विकासपट वेगाने धावत आहे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली टेक-ऑफ घेतले. प्रगती आणि विकास हे हातात हात घेऊन येतात. हा नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. इथून फक्त विमानांचे उड्डाण होणार नाही, तर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत उभारला जाणार आहे. देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील दोन-चार वर्षांत सर्व मेट्रो लाइन सुरू होतील आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त एका तासात पोहोचता येईल हे फक्त महायुतीच करू शकते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक विकास प्रकल्पांना सुरुवात झाली होती, परंतु महाविकास आघाडी सरकारने मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पांना ब्रेक लावला होता. २०२२ मध्ये महायुती सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्व अडथळे दूर केले आणि हे प्रकल्प पुन्हा मार्गी लावले. केवळ तीन वर्षांत महाराष्ट्राचा विकासपट वेगाने धावत आहे.
हे प्रकल्प राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे : उपमुख्यमंत्री अजित पवार
आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं तसंच मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशानं विकासाची नवी झेप घेतली आहे. 'विकसित भारत २०४७' या ध्येयाकडे आपण वेगानं वाटचाल करतोय. या प्रवासात आपला महाराष्ट्र अग्रस्थानी राहील, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत समन्वयानं, वेगानं काम करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरु झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करताहेत, ही आपली मोठी ताकद आहे. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आपल्याला अजून विकासाचे अनेक टप्पे गाठायचे आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.