मराठी हा राजकारणाचा नव्हे तर, सन्मानाचा विषय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

08 Oct 2025 14:00:02

मुंबई : "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब होती. आपल्याकडे काही जणांसाठी मराठी हा राजकारणाचा विषय आहे, मात्र मराठी हा राजकारणाचा नव्हे तर सन्मानाचा विषय आहे " असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी सन्मान सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " महायुती सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यांमध्ये गुंतवणूक आणण्यात आपण यशस्वी झालो. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याचं स्वप्नसुद्धा आपण साकार केलं. म मांगल्याचा, म मायेचा आणि म मराठीचा तसेच म मजबुतीचा हा विचार आपण रुजवला. आपल्या मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा साता समुद्रापार गौरव होत आहे. येणाऱ्या काळात आपल्या मराठी तरुणांसाठी, युवकांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये क्षमता वृद्धी केंद्र आपण उभी करणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र मिळून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणार आहेत "

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे तथा मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांचा यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखक प्रदीप कर्णिक, प्राचार्थ अशोक चिटणीस, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांचा यावेळी गौरव करण्यात आला. भाषा मंत्री उदय सामंत यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपल्या साहित्यकांचे खूप मोठे योगदान आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानास्पद बाब आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार प्रसार वाढावा यासाठी आपण काम करणार आहोत." संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले भाषेसाठी काम करणाऱ्या माणसांचा गौरव म्हणजे खऱ्या अर्थाने भाषेचा गौरव आहे. प्रतिनिधिक स्वरूपात गौरव स्वीकारताना मिलिंद जोशी म्हणाले की " मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागच्या अनेक वर्ष आम्ही काम करत होतो. अभिजात भाषेचा हा दर्जा मिळाल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अंतरंगात अभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे. भाषा हा लोकशक्तीचा श्वास आहे, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ आपलं काम संपलं असं नसून आपल्यावरची जबाबदारी वाढलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. "


Powered By Sangraha 9.0