दिवाळी कार्यक्रमात लंडनचे महापौर सादिक खान उपस्थित राहणार
08-Oct-2025
Total Views |
मुंबई : लंडनचे महापौर सादिक खान यांनी विश्व हिंदू परिषद युनायटेड किंगडमला 'दिवाळी इन लंडन' या समितीमध्ये घेतले. तसेच लंडनच्या ट्राफलगर स्क्वेअर येथे होणाऱ्या दिवाळी कार्यक्रमात ते स्वत: उपस्थित राहणार आहेत. यामुळेच काही डाव्या आणि विशिष्ट धर्माच्या गटांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सादिक खान यांच्यावर टिकेची झोड उठवली. परंतु ते त्यांच्या मतावर ठाम असून कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
घटनेचा प्रारंभ लंडनच्या दिवाळी कार्यक्रमाची तयारी चालू असताना झाला. 'दिवाळी इन लंडन' नावाच्या समितीमध्ये विश्व हिंदू परिषद युनायटेड किंगडम शाखेला सहआयोजक संस्थांमध्ये समाविष्ट करण्यात आले. यानंतर काही ब्रिटिश मीडिया संस्थांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर काही गटांनी महापौर सादिक खान यांच्यावर टीका करत सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू केले. विशेषतः काही विशिष्ट संस्थांनी आणि तथाकथित मानवाधिकार कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, विश्व हिंदू परिषद भारतात अल्पसंख्याकांविरोधात भूमिका घेते आणि त्यामुळे तिच्या सहभागामुळे “लंडनची बहुसांस्कृतिक प्रतिमा” धोक्यात येईल.
लंडनमधील भारतीय वंशाचे लोक मात्र या विरोधामुळे नाराज आहेत. त्यांनी सांगितले की, “वर्षानुवर्षे हिंदू समाज लंडनमध्ये शांततेने आपले सण साजरे करत आला आहे. विश्व हिंदू परिषद सारख्या संस्थांना हिंदुत्ववादी म्हणून लक्ष्य करणे हा पूर्वग्रहाचा प्रकार आहे.”
महापौर कार्यालयाने या वादावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “लंडन ही विविधतेने नटलेली राजधानी आहे. येथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीला आपले सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. दिवाळी साजरीकरणात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांचा हेतू आनंद, एकात्मता आणि समरसता वाढवणे हा आहे. त्यामुळेच विश्व हिंदू परिषदेला सहआयोजक संस्थांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेत महापौर सादिक खान उपस्थित राहणार आहेत." एकीकडे डाव्या आणि विशिष्ट धर्माच्या गटांनी विरोध केला असला, तरी अनेक भारतीय आणि हिंदू समुदायांनी या निर्णयाचे स्वागत केले.