केडीएमसीची कर वसुलीची मोहिम अधिक तीव्र; रेस्टॉरंटसह महाविद्यालयांना दणका

08 Oct 2025 19:32:26

कल्याण : केडीएमसीच्या कर विभागाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिकाधिक तीव्र केली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी केलेल्या कारवाईत रेस्टॉरंटसह महाविद्यालयांना दणका दिला आहे.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व प्रभागातील कर विभागातील कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर वसुलीची मोहिम अधिकाधिक तीव्र केली आहे. त्याअंतर्गत क प्रभागातील सहा.आयुक्त धनंजय थोरात, कर अधिक्षक जयवंत बजागे व त्यांच्या पथकाने ॲचिवर्स कॉलेज, कल्याण (पश्चिम) यांच्याकडून मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी रु.44,50,958/- इतक्या रक्कमेचा धनादेश वसूल केला. तसेच बोरगांवकर वाडी, कल्याण रेल्वे स्थानक परिसर येथील एकुण 7 गाळे रक्कम रु.23,91,721/- इतक्या थकबाकी पोटी सील करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉटेल शिवसागर, व्हेज रेस्टॉरंटचे देखील एकुण 7 गाळे रक्कम रु.12,24,073/- इतक्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई क प्रभागाच्या कर विभागामार्फत दिवसभरात करण्यात आली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मंगळवारी आय व ई प्रभागातील मालमत्ता कर विभागाचा, भागनिहाय लिपिक वसूलीचा आढावा घेवून, कर वसूली वाढविण्याच्या सक्त सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.


Powered By Sangraha 9.0