मुंबई : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील नैनापूर येथे गरीब आणि अशिक्षित हिंदू नागरिकांना विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून धर्मप्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य, पेन ड्राइव्ह आणि पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.
घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी नैनापूर या गावात छापा टाकला. पाच जणांना अटक केल्यानंतर तपासात उघड झाले की, आरोपी गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना पैशाचे, नोकरीचे आणि शिक्षणाचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होते. त्यांना सांगितले जात होते की, “हिंदू धर्म चुकीचा आहे, एक विशिष्ट धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दु:ख दूर होईल.” काही ठिकाणी तर हिंदू देवतांबद्दल अवमानकारक भाष्य करून लोकांचे धर्मपरिवर्तन केले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अलवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, या संशयास्पद घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये अमृत उर्फ प्रशांत जाटव, रोहित उर्फ गुड्डू जाटव, रामनारायण बैरवा, महेश मेघवाल आणि केशव बेदादा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(२) आणि २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा धर्मांतराचा मुद्दा राजस्थानच्या राजकारणात चर्चेत आला आहे. गरीब आणि असहाय्य लोकांना धर्म बदलण्यासाठी फसवणे किंवा दबाव आणणे हे राज्यातील कायद्यानुसार गुन्हा आहे. या नव्या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे मागणी केली आहे की, अशा धर्मांतर रॅकेटचं मूळ शोधून कडक कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने स्पष्ट केले की, तपास निष्पक्ष पद्धतीने होईल आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.