सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ! प्रति तोळ्याची किंमत १,२३,००० रूपयांच्या पार...

08 Oct 2025 18:45:59

मुंबई :
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता सोन्याचे दर तब्बल प्रति तोळा १ लाख २३ हजारांच्या पार गेले आहेत. मागील काही वर्षांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. जागतिक बाजारातील आर्थिक मंदी, भू- राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि चलनविषयक धोरणातील बदल या सर्व घटनांमुळे गुंतवणूकदारांचा कल आता सोन्याकडे वाढलेला दिसतोय. त्यामुळे दिवाळी तोंडावर आलेली असताना सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या महागाईच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. शिवाय सोन्याची मागणी आणि पुरवठा यावरून किंमतीत वाढ किंवा घसरण होत असते. जानेवारी २००८ ते ऑगस्ट २०११ पर्यंत सोन्याच्या किमती १०० टक्क्यांनी वाढल्या. त्याचप्रमाणे, जानेवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यान सोन्याच्या किमती अंदाजे ५३ टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि या वर्षी किमती ६०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत.

सोन्याचा दर सध्या काय आहे?

त्यामुळे जर, तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला किंमती माहिती असणं गरजेचे आहे. आज भारतामध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,३३२ रूपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ११,३०५ रूपये इतकी आहे, तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,२५३ रूपये आहे. सोबतच चांदीची किंमत प्रति ग्रॅम १५७ रूपये इतकी आहे.


Powered By Sangraha 9.0