मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक’ला हिंदू जनजागृती समिती, समर्थ सेवा मंडळांचा इशारा

08 Oct 2025 13:12:53


मुंबई : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शक म्हणून नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . पण या चित्रपटाच्या नावावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे. मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगडचे ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिला आहे.

राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडणे आहे. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन 'मनाचे श्लोक' हे नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.‌ त्याचबरोबर चित्रपटाचे नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा स्पष्ट इशाराही समितीद्वार देण्यात आला आहे.

हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे की, नैतिक मूल्ये शिकविणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्त आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे.





समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांनी दिलेल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे की, "श्रीमद्भगवद्गीता" , "मनाचे श्लोक" असे अखिल जगताचे कल्याण होईल इतकी ताकद ह्या ग्रंथात आहे, त्यालाच मनोपनिषद असेही म्हणतात. जवळ जवळ ३५० वर्षांहून अधिक काळापासून सातत्याने या श्लोकांचा अभ्यास, पठण आणि प्रचार जागतिक स्तरावर अत्यंत श्रद्धेने केला जात आहे. शारीरिक, मानसिक ,आध्यात्मिक उन्नतीचा हा प्राचीन ग्रंथ असून अखिल भारतीयांच्यासाठी अतीवआदर आणि श्रद्धेचा स्त्रोत आहे. हजारो वर्ष केवळ सनातन धार्मिक देवता आणि श्रद्धास्थानांची सातत्याने आणि जाणीवपूर्वक अवहेलना होत आहे हे अत्यंत कटू सत्य आहे.

चित्रपटात जर या नावाचा उपयोग मनोरंजनाच्या अथवा काही काल्पनिक कथानकासाठी होत असेल, आणि त्या कथेत संतपरंपरेशी विसंगत, अश्लील अथवा विकृत काही दृश्ये, संवाद किंवा सादरीकरण असेल, तर तो सरळ सरळ राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा आणि संतपरंपरेचा अवमान ठरेल.

समर्थ सेवा मंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, “मनाचे श्लोक” हे नाव त्वरित चित्रपटाच्या शिर्षकातून वगळण्यात यावे. त्याला सुसंगत असे योग्य नाव देण्यात यावे. जेणेकरून कोणाच्याच भावना दुखावणार नाहीत. जर चित्रपटाची कथावस्तू श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीशी सुसंगत नसेल, तर त्यात हे नाव वापरणे हे दिशाभूल करणारे, अभद्र आणि अपमानास्पद आहे.




दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये प्रेमकहाणी, रुसवे-फुगवे आणि कौटुंबिक ड्रामा असा आशय पाहायला मिळत आहे.

Powered By Sangraha 9.0