काँग्रेसचे फोडाफोडीचे राजकारण

08 Oct 2025 11:05:57

काँग्रेसला देशाच्या स्वातंत्र्याचा वारसा मिळाला. त्याचबरोबर ब्रिटिशांचा ‘फोडा आणि राज्य करा’ हा अवगुणही काँग्रेसने घेतला. याच नीतीने त्यांनी देशातील हिंदूंना जातीपातींमध्ये विभागून राज्यसत्तेचे सुख उपभोगले. आज ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सरकार आहे, तिथे अजूनही याच नीतीचा अवलंब काँग्रेस पक्ष करताना दिसतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे ताजे विधान काँग्रेसच्या याच ब्रिटिश वारशाचा परिचय देणारे!

कर्नाटकातील लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म असल्याचे विधान करून, मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. सिद्धरामय्या यांना राज्यात सतत संघर्षाचे वातावरण नसेल, तर आपली खुर्ची टिकविणे अवघड जाते. उपमुख्यमंत्री असलेले डी. के. शिवकुमार हे त्यांची खुर्ची खेचण्यास टपून बसले आहेत. त्यामुळे राज्यात नवनवे वादंग निर्माण करून, मूळ प्रश्नापासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आताही कसलेच कारण नसताना, त्यांनी पुन्हा एकदा लिंगायत समाजाबाबत नाहक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालविलेला दिसतो.

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक काँग्रेसने लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची विधाने करून, हिंदू मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. हिंदूंच्या विविध जाती आणि पंथांना अलग करून, त्याचे राजकारण करून, ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने राजकारण साधायचे हे काँग्रेसचे जुनेच धोरण. ब्रिटिशांपासूनच त्यांना हा वारसा लाभला आहे. ब्रिटिश सरकारी अधिकार्‍याने स्थापन केलेल्या या संघटनेला मिळालेले हे ‘फोडा आणि झोडा’चे बाळकडू, अजूनही काम करीत आहे.

हिंदू धर्मात अनेक पंथोपपंथ आहेत. शैव आणि वैष्णव हे प्रमुख असले, तरी त्यांच्यातही अनेक उपपंथ आहेत. ते प्रामुख्याने उपासना पद्धती आणि रिवाजांमुळे वेगळे वाटतात. त्यात भौगोलिक भेदही आहेत. पंजाबी असो की बंगाली, ते सर्व भारतीयच आहेत. त्याचप्रमाणे लिंगायत, वोक्कलिग, कापू, खम्मा, गौंडर यांसारखे विविध समाज, हे हिंदूंमध्येच गणले जातात. तसेच बहुतांशी लिंगायत समाजही आपल्याला हिंदूच मानतो, हे समजून घेतले पाहिजे. लिंगायत समाजाचे पाच पीठ असून, त्या पाचही पीठांच्या जगद्गुरूंनी ‘आम्ही प्रथम लिंगायत आहोत. पण, लिंगायत पंथ आहे आणि याची मूळ धारणा हिंदू आहे,’ अशी स्पष्ट भूमिका यापूर्वीच घेतली आहे.

वीरशैव लिंगायत समाज सर्व हिंदू सण, परंपरा, यात्रांचेही पालन करतो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग आणि अनेक शिवमंदिरांचे पौरोहित्य आज वीरशैव लिंगायत समाज करीत आहे. अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारीही लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही. खरं तर काँग्रेसच्याच काळात २०१३ साली याविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या रजिस्टर जनरलनेही लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची मागणी धुडकावून लावली होती. एवढेच नाही तर ‘लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे,’ असा स्पष्ट निर्वाळाही दिला होता. पण, केवळ राजकीय स्वार्थासाठी सिद्धरामय्या यांनी वेळोवेळी हीच भूमिका मांडून समाजात फुटीची बीजे पेरण्याचेच उद्योग केले. त्यामुळे या षड्यंत्रापासून अखंड सावध राहिले पाहिजे आणि लिंगायत समाजबांधवांनाही या षड्यंत्रापासून परावृत्त करायलाच हवे.

फक्त हिंदू धर्मच नाही, तर जगातील प्रत्येक धर्मात विविध पंथ आहेत. ख्रिश्चनांमध्ये कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट हे प्रमुख पंथ असले, तरी ग्रीक ऑर्थोडॉक्स आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्च, इजिप्तमधील कॉप्टिक आणि सायप्रसमधील सिप्रियॉटस, आर्मेनियन ख्रिश्चन, पॅलेस्टाईनमधील ख्रिश्चन वगैरे ख्रिस्ती धर्माच्या अनेक शाखा आहेत. मुस्लिमांमध्ये तर यापेक्षाही अधिक पंथोपपंथ आहेत. इस्लाममध्ये एकंदर ७३ अधिकृत पंथ आहेत. शिया-सुन्नी हे प्रमुख पंथ असले, तरी अहमदिये, इबादी, सूफी हेही पंथ आहेत. जैन या हिंदूंच्या पंथात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख उपपंथ आहेत.

शिखांमध्येही असेच पंथ आहेत. हे सर्वच धर्मांमध्ये दिसून येते. याचा अर्थ असा प्रत्येक पंथ हा स्वतंत्र धर्म ठरत नाही. पण, मुळात हिंदूंमधील वाढत्या एकजुटीमुळे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, डावे पक्ष वगैरे कथित सेक्युलर पक्षांची झोप उडाली आहे. या पक्षांनी आजवर हिंदूंमधील विविध जातीपातींमधील फाटाफुटीचा राजकीय लाभ घेत, आपले बस्तान बसविले होते. पण, या पक्षांकडून आपल्याला फायदा होत नाही आणि आपल्यातील फाटाफुटीमुळेच आपली दैन्यावस्था झाल्याचे हिंदूंच्या लक्षात आले.

रा. स्व. संघाने सुरुवातीपासूनच अवघा हिंदू एक मानला होता. पण, केंद्रात सत्ता आल्यावर भाजपने राजकीयदृष्ट्या हिंदूंना जागृत आणि एकजूट केल्यावर, गेल्या काही वर्षांत त्याचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, प. बंगाल वगैरे अनेक राज्यांमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये आजवर फक्त कथित सेक्युलर पक्षांचे उमेदवार निवडून येत असत, तेथे भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागले. जातींच्या ठेक्यावर स्थापन झालेल्या पक्षांनाही त्याचा फटका बसला. म्हणूनच हिंदूंची एकजूट तोडण्याचे नवे डावपेच काँग्रेसने सुरू केले, ते जातीनिहाय जनगणनेच्या मागणीद्वारे. जाती-जातींमधील अभिनिवेष आणि त्यांच्या अहंभावाला फुंकर मारून, हिंदूंना पुन्हा जातींमध्ये विभाजित करण्याचे हे षड्यंत्र होते. पण, ते सुद्धा अयशस्वी ठरले.

ब्रिटिशांनी विशाल भारतखंडाचे नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, पाकिस्तान वगैरे असे अनेक खंड केले. या प्रत्येक खंडावर त्यांना आपली पकड बसविता आली. पेशवाईत राघोबादादांनी आजच्या पाकिस्तानातील अटक येथपर्यंत मोहीम आखून, विजय मिळविला होता. इराणच्या शहाला लिहिलेल्या एका पत्रात, राघोबादादांनीच मराठ्यांच्या (हिंदवी) साम्राज्याच्या सीमा या काबूल-कंदाहारपर्यंत असल्याचे नमूद केले आहे. इतका विशाल देश आपल्या एकछत्री अंमलाखाली ठेवणे, ब्रिटिशांच्या कुवतीबाहेरचे होते. म्हणून त्यांनी भारताचे अनेक देशांमध्ये पुढे विभाजन केले. तत्कालीन भूराजकीय परिस्थितीत ते चालूनही गेले. पण, आता हिंदूंची अस्मिता आणि या पक्षांचे कुटिल राजकारण यासंदर्भात हिंदूंमध्ये जागृती होत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी तर ‘बटेंगे तो कटेंगे’ हा महामंत्रच दिला होता. एकूणच काय तर, लिंगायत समाजाला हिंदूंपासून असे पद्धतशीरपणे तोडले, तर हिंदूंमध्ये अनेक संप्रदाय आहेत, जे पुढे स्वतंत्र धर्माची मागणी करतील, हीच काँग्रेसची सुप्त इच्छा. पण, मुद्दा केवळ लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा नसून, हिंदू धर्मात विभाजनाचा हा कुटिल डाव आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकार हे कायमच हिंदूद्वेष्ट्या भूमिका घेत असते. आताही तीच भूमिका त्यांनी घेतली आहे, जी वेळीच खोडून काढायला हवी!
Powered By Sangraha 9.0