सप्तर्षि सन्मान

08 Oct 2025 12:37:00

हिंदू रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे साहित्यातील वाल्मिकी ॠषींच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मला जाहीर झाला. दि. ५ ऑक्टोबरला नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. हा पुरस्कार सोहळा अतिशय आगळा-वेगळा होता; भारतीय परंपरा, संस्कृती जपणारा आणि ज्ञानवर्धक. या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याचा मागोवा घेणारा हा लेख...

पुरस्काराचे अनेक कार्यक्रम मी अनुभवले आहेत. परंतु ‘हिंदू रिसर्च फाऊंडेशन’च्या पुरस्काराचा कार्यक्रम हा आजवर अनुभवलेल्या सर्व कार्यक्रमांत आगळावेगळा ठरावा असा झाला. दि. ५ ऑक्टोबरला नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात सलग चार तास चाललेल्या कार्यक्रमांत वेगळेपण काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कार्यक्रमाची लांबी हे त्याचे वेगळेपण असले, तरी ‘लांबीतही कुठेही न भरकटलेला कार्यक्रम’ असे त्याचे वर्णन करावे लागेल. या कार्यक्रमाचे पहिले आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे, भारतातील सात प्राचीन ॠषींच्या नावाने सातजणांना पुरस्कार देण्यात आले. या ॠषींची नावे अशी, वाल्मिकी, नागार्जुन, कणाद, भारद्वाज, विश्वकर्मा, आर्यभट्ट, आचार्य सुश्रुत. यांतील प्रत्येक ॠषी हे मूलतः वैज्ञानिक आहेत.

आधुनिक काळात ‘वैज्ञानिक’ म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे पाश्चात्य पोशाखातील पाश्चात्य वैज्ञानिकांचे चेहरे येतात. आणि ‘ॠषी’ म्हटले की, दाढी आणि केस वाढविलेली, भारतीय वस्त्र धारण केलेली व्यक्ती येते. या ॠषींना आपण श्रद्धेय, पूजनीय मानत असतो. यातील काही ॠषींचे उत्सवही देशभर साजरे केले जातात. प्रत्येक ॠषींचे ग्रंथ आहेत. त्याचे श्रद्धेने पठण केले जाते. पठणाचा सामान्य उद्देश पुण्यप्राप्ती व्हावी, इहलोकीचे आणि परलोकीचे जीवन सुखी व्हावे, असा असतो. त्या ग्रंथांतील तत्त्वज्ञान, वैज्ञानिक सिद्धांत याच्या खोलात सामान्य माणूस जात नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना संस्थेचे संचालक टी. एस. भाल म्हणाले की, “हे सर्व प्राचीन ज्ञान संस्कृतमध्ये आहे. सामान्य माणूस संस्कृतमध्ये पारंगत नसतो. अनेक ग्रंथांना धर्मग्रंथांचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या पोथ्या केल्या आहेत. आणि कर्मकांडात अडकलो आहोत. हे ज्ञान बाहेर काढले पाहिजे. आधुनिक ज्ञानाशी त्याची सांगड घातली पाहिजे आणि ते पुनरुज्जीवित केले पाहिजे.” डॉ. टी. एस. भाल यांचे प्रास्ताविक ऐकत असताना मला इडर्विन शोडिंगर यांची आठवण झाली. क्बांटम विज्ञानाच्या जनकातील ते एक आहेत. ते भारतात आले होते. गुरुदेव रवींद्रनाथांशी त्यांचा संवाद झाला होता. क्बांटम विज्ञानाच्या प्रयोगशाळेत जे सत्य त्यांना जाणवू लागले, त्याने ते फार गोंधळून गेले.

मूलकणांच्या अवस्थेत कण कधी कणाच्या रूपात असतात, कधी तरंगांच्या रूपांत असतात, एकाच वेळेला इथेही असतात आणि तिथेही असतात. आणि त्यांच्यात निरंतर परिवर्तन होत राहाते. त्यांच्याविषयी निश्चितपणे कोणतेही भाकीत करता येत नाही. अनिश्चिततेचा सिद्धांत मांडला गेला. विज्ञानाचे सिद्धांत अनिश्चितता सांगत नाहीत. शोडिंगर यामुळे अस्वस्थ होते आणि जेव्हा त्यांनी ‘छांदोग्य उपनिषदा’तील उद्दालक आणि श्वेतकेतू यांचा संवाद वाचला आणि अतिसूक्ष्म तत्त्व तू आहेस, ‘तत् त्वम असि’ हा सिद्धांत वाचला, तेव्हा त्यांना काय वाटले, हे त्यांनी ‘माय व्ह्यू ऑफ वर्ल्ड’ या पुस्तकात लिहिले आहे.

आपल्या प्रत्येक ॠषीच्या कृतीत विश्वाचे रहस्य उलगडून सांगणारी तत्त्वे दडलेली आहेत. त्याचा गहन अभ्यास होणे गरजेचे आहे. याची जाणीव करून देणे हे या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य होते. ज्या सातजणांना सात ॠषींच्या नावाने पुरस्कार देण्यात आले. ते सर्व आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत आणि प्रत्येकाचे मनोगतही झाले. सर्वजण पाश्चात्य विद्याविभूषित असले, तरी त्यांच्या वाणीतून मी एक प्राचीन संस्कृतीचा वाहक आहे, हे या ना त्या प्रकारे प्रकट झाले, हे कार्यक्रमाचे तिसरे वैशिष्ट्य होते. ‘एआय’चा उपयोग करून स्क्रिनवर ज्या ॠषीच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे, तो ॠषी अवतरत असे. स्वतःच्या कार्याविषयी तो माहिती देत आणि मग माझ्या क्षेत्रातील या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात आहे, याचा आनंद व्यक्त करी. ‘एआय’चा उपयोग करून केलेला माझ्या जीवनातील हा पहिलाच कार्यक्रम होता. पडद्यावर कणाद, आर्यभट्ट, सुश्रुत इत्यादींना पाहताना आणि त्यांचा संवाद ऐकत असताना सर्वचजण ॠषिकाळात जाऊन आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य म्हणाले, “आपल्याकडे परंपरा, ज्ञानाचे भंडार आहे. त्याचा प्रचार व प्रसार आपण करीत नाही. ज्ञान आणि ज्ञानार्जन करणार्‍या संस्थांचा आपण आदर केला पाहिजे. आपल्याकडील ज्ञानाचे डिजिटायझेशन करण्याची गरज आहे. त्या काळच्या गुरुकुलासारख्या प्रणालींची आजच्या परिस्थितीशी सांगड घालून जे उत्तम आहे, ते स्वीकारले पाहिजे. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, “जे अनुकरणीय असतात, तेच अतुलनीय असतात; तेच सप्तर्षि असतात आणि कालजयी असतात. प्राचीन काळात विविध शाखांचे ज्ञान देणारे आपले सप्तर्षि जरी आकाशात अढळस्थानी जाऊन बसलेले असले, तरी या आधुनिक सप्तर्षिंच्या रूपाने ते या धरतीवर अवतरलेले आहेत. आकाशातील ‘तारे जमीं पर’ आले आहेत. त्यांच्यामुळे ही ‘जमीं सरजमीं’ झालेली आहे.”

सप्तर्षि पुरस्काराचे मानकरी

पद्मविभूषण प्रो. एम. एम. शर्मा यांना नागार्जुन पुरस्कार, पद्मश्री डॉ. रवी ग्रेव्हर यांना आचार्य कणाद पुरस्कार, पद्मश्री प्रहलाद रामाराव यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार, पद्मश्री रमेश पतंगे यांना महर्षी वाल्मिकी पुरस्कार, प्रो. डॉ. जी. माधवी लता यांना विश्वकर्मा पुरस्कार, प्रो. इंद्रनील बिस्वास यांना आर्यभट्ट पुरस्कार, तर डॉ. अनिल गोल्हर यांना आचार्य सुश्रुत पुरस्कार देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0