माहितीसत्ता, मानसिक नियंत्रण आणि सुखाचे मृगजळ

08 Oct 2025 12:13:32

मानवाने औद्योगिक क्रांतीनंतर सातत्याने यंत्रांच्या क्षेत्रात प्रगती साधली. त्यामुळे सातत्याने मानवी श्रमाची बहुसंख्य कामे यंत्रांच्या माध्यमातून होऊ लागली. त्यामुळे कामांचा वेग जरी वाढला असला, तरी निरंकुश स्पर्धाही वाढली. सुखाच्या बदललेल्या व्याख्यांचा परिणामही मानवी आयुष्यावर झाला. या आणि अशाच अन्य असंख्य बदलांचा घेतलेला आढावा...

पाश्चात्य अर्थविचार’ हा ’भांडवलशाही’ आणि ’साम्यवाद’ या दोन तत्त्वांमध्ये विभागलेला आपल्याला दिसत असला, तरी या दोन्हीची नीतिमूल्ये एकाच पायावर आधारलेली आहेत. सौख्यवाद आणि उपयुक्ततावाद , या मानवी समाजात सुखाचे आधिक्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन करणार्‍या नीतितत्त्वांचा या दोन्ही अर्थप्रणालींना पायाभूत आधार आहे. परंतु, सौख्यवादाच्या मुळाशी असलेली मानवी सुखाची भावना नेमकी कोणती, याच्या व्याख्येत ही सर्व चिंतने सतत कमी पडत आलेली आहेत.

कोणत्याही प्रश्नाच्या विश्लेषणासाठी देकार्तीय विकलन पद्धती योग्य असल्याच्या समजुतीतून सुख म्हणजे काय किंवा सुख कशात असते, यांसारखे गुणात्मक प्रश्न टाळून सुख मोजण्याचे सर्वाधिक योग्य परिमाण काय आणि मग त्या परिमाणात मोजलेले सुख सतत वाढवत कसे न्यायचे, यांसारख्या संख्यात्मक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सर्वच पाश्चात्य चिंतने करतात. अशा सर्व चिंतनांचे अंतिम गंतव्य काय, हा प्रश्न सहसा अनुत्तरितच ठेवला जातो. भांडवलशाही विचार आज जरी सर्व जगात सर्वमान्य झाल्यासारखा वाटत असला, तरी अनेक राष्ट्रीय सरकारांच्या निवृत्तिवेतनासारख्या धोरणांमुळे त्यात काही साम्यवादी अंशही आज मिसळल्यासारखे वाटतात.

आजच्या काळात स्थिरपद झालेल्या राज्यनियमित बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या गंतव्याचे अथवा निरंकुशतेचे आधार आणि त्यामागची तत्त्वे, आज आपण थोडी समजावून घेऊ. औद्योगिक क्रांतीपासून मानवी प्रगतीचे टप्पे पाहता, प्रत्येक टप्प्यावर मानवी समाजाच्या हाती काही नवीन विज्ञान अथवा तंत्रज्ञान मिळालेले आहे. याचा वापर करूनच मानवाने दर वेळी एक मोठी झेप घेत, प्रगतीचा एक वेगळा स्तरही गाठलेला आहे. या प्रगतीबरोबरच मानवी समाजजीवनातही काही अपरिहार्य बदल होत गेलेले आहेत. हे बदल न्यूनाधिकपणे सर्वत्र तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबर लादले गेले आहेत. त्यांची सामाजिक मूल्यांच्या आधारावर स्वीकारार्हता काय, याचा विशेष ऊहापोह सामाजिक जीवनात झालेला नाही.

या बदलांच्या पहिल्या टप्प्यावर आपण वाफेच्या इंजिनाचा शोध पाहू शकतो. पुनरुज्जीवन कालखंडात युरोपात झालेले विज्ञानाच्या समाजमान्यतेतील परिवर्तन आणि एका नवीन वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रचलन, या शोधासाठी महत्त्वाची पार्श्वभूमी होते. त्याचबरोबर या काळात स्थापन झालेल्या जागतिक व्यापारी संबंधांमुळे, युरोपला नवीन उद्योगांसाठी आर्थिक भांडवलही उपलब्ध होते. वाफेच्या इंजिनाचा शोध जरी सुरुवातीच्या काळात पुरेसा असला, तरी लवकरच वाढत्या औद्योगिकीकरणास नवीन ऊर्जास्रोतांची आवश्यकता होती. दगडी कोळसा अपुरा पडतो आणि त्याने प्रदूषण व तज्जन्य आजार होतात, हे लक्षात आले होते.

खनिज तेलाचा शोध लागल्यावर हे सर्व प्रश्न सुटल्यासारखे वाटले. परंतु, प्रदूषणाचा प्रश्न खनिज तेलाच्या वापरानेही सुटत नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व स्रोत नाशवंत असून त्याचे पुनर्निर्माण करता येत नाही. या सर्व पर्यावरणीय प्रश्नांसहित आजही आपण कोळसा आणि खनिज तेल हेच मुख्य ऊर्जेचे स्रोत म्हणून वापरतो. खनिज ऊर्जेवर चालणार्‍या महाकाय यंत्रांनी मानवी श्रमाची आवश्यकता मर्यादित केल्यावर, मानवी समाजात घडलेली दुसरी महत्त्वाची क्रांती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्रांती. या क्रांतीने दोन महत्त्वाचे बदल घडवले ते म्हणजे, अतिशय वेगवान झालेले माहिती आणि दळणवळण क्षेत्र आणि सुनिश्चित टप्पे असलेल्या कार्यांमध्ये स्वयंचलनाची शक्यता.

मानवी मेंदू कसा विचार करतो आणि त्यातील कोणते भाग यंत्राद्वारे पार पाडता येतील, असा प्रमुख विचार या तंत्रज्ञानांच्या विकासामागे होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रबोधनकाळातील तर्कप्रधानतेचा पगडा समाजातील प्रमुख चिंतकांवर आणि वैज्ञानिकांवरही होता. त्यामुळे निश्चित तर्कप्रणालीच्या आधारे निश्चित आज्ञावली निर्माण करणे, त्यात उपलब्ध माहितीच्या आधारे नियमबद्ध करता येण्याजोग्या निर्णयप्रक्रियेचाही अंतर्भाव करणे आणि हे सर्व अधिकाधिक वेगाने करण्याचा प्रयत्न करणे, या दिशेचे प्रयत्न या कालखंडात झाले. वेगवान झालेल्या दळणवळण साधनांनी आधी प्रगत देशांमध्ये आणि हळूहळू जवळपास संपूर्ण जगात माहिती जलदपणे पोहोचवण्याचे तंत्र साध्य झाले.

त्यायोगे अनेक आर्थिक व्यवहारांमधील निर्णयप्रक्रिया अधिक जलद आणि वस्तुनिष्ठ प्रकारे होऊ लागली. या दुसर्‍या क्रांतीने आकडेमोड, पाठांतर यांसारखी सोपी बौद्धिक कामे मानवी समाजापासून दूर नेली. भांडवलशाही विचार काही मूठभर लोकांच्याच हातात संपत्तीच्या एकवटण्याला गैर मानत नाही, हे आपण पाहिले. परंतु, संपत्ती म्हणजे काय याचे आकलन मात्र या सर्व काळात बदलत गेले. प्राचीन काळी जेव्हा वस्तुविनिमय चालत असे, तेव्हा अधिकाधिक स्थावर आणि जंगम संपत्ती साठवण्याला जे महत्त्व होते, ते आताच्या काळात विविध आस्थापनांच्या, मालमत्तांच्या आणि संस्थांच्या मालकी अधिकाराला आले आहे.

अधिकाधिक संपत्ती ही आभासी स्वरूपात असून, तिचे दृश्य रूप हे आपल्या ताब्यातील आस्थापनांच्या आणि संस्थांच्या संचालनाचा अधिकार आणि त्यातून अधिकाधिक नफा मिळवत ही संपत्ती वाढवत ठेवण्याची क्षमता असे झाले आहे. संपत्तीच्या जोरावर बाजारपेठेचे नियंत्रण, त्यातून अधिक संपत्तीची निर्मिती आणि नियंत्रणाची अधिक सर्वंकषतेकडे वाटचाल हा मार्गच मानवी प्रगतीचा योग्य मार्ग आहे, असे या मांडणीत प्रतिपादले जाते. या मांडणीचा प्रतिवाद करण्यासाठी, तिची बलस्थाने नीट समजावून घेणे आवश्यक आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सुखाची आणि उपयुक्ततेची कल्पना.

आताच्या पाश्चात्य मांडणीतील सुखाच्या कल्पनेनुसार, सुखप्राप्तीचा बाजारपेठीय मार्ग हा सर्वाधिक कार्यक्षमतेचा आणि म्हणून सर्वाधिक योग्य आहे हे स्वयंसिद्धच आहे. त्यामुळे त्याच चौकटीत राहून या मांडणीला आव्हान देणे निव्वळ अशक्य आहे, हे निर्वसाहतीकरणाच्या अभ्यासकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रगतीच्या या टप्प्यांमध्ये आज जो शेवटचा टप्पा आपण अनुभवत आहोत आणि येणार्‍या दशकात अधिक उघडपणे आपल्या अनुभवास येणार आहे तो म्हणजे, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा टप्पा. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही मानवी कार्ये यंत्रांकडे सोपवून, त्याप्रकारच्या कार्यक्षमतेचे महत्त्व कमी केल्याचे पाहिले.

या सर्व टप्प्यांच्या मागचा विचार ‘मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे,’ असाच होता. त्यामुळे प्रथम बुद्धीची कार्ये महत्त्वाची मानून, शारीरिक कार्यांना त्याज्य मानले गेले. नंतर बौद्धिक कामांमध्येसुद्धा एकाच प्रकारे वारंवार करावी लागणारी कामे संगणकामार्फत केली जाऊन, मानवी काम कमी करण्याचे धोरण आले. आता यापुढे सृजनात्मक वैचारिक कामातीलही काही भाग, आपण यंत्रांद्वारे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करत आहोत. मानवी कार्यक्षमतेचे कोणते आयाम यामुळे कार्यप्रवणतेस उपलब्ध राहतील, याचा आवाका जाणणे आज अवघड बनले आहे.

परंतु, या सर्व तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा भांडवलशाही दृष्टिकोनातून हेतू काय? देकार्तीय विकलन प्रणालीनुसार यंत्रे, आस्थापने, त्यात चालू असणार्‍या विविध व्यवस्था, कार्यपद्धती, त्यात कार्यरत असणारी माणसे हे सर्व एका मोठ्या यंत्रप्रणालीचा भाग असून, या प्रणालीचे मुख्य काम त्या त्या आस्थापनाच्या भागधारकांना, त्या राष्ट्राला किंवा संपूर्ण मानवी जगाला अधिकाधिक नफा मिळवून देणे असा आहे. या जगड्व्याळ प्रणालीत प्रत्येकानेच आपापल्या वाट्याला येणार्‍या अपेक्षित सुखाच्या प्रमाणात कार्यक्षमता दाखवत किंवा अवांछित दुःख टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट काम करणे अपेक्षित आहे. परंतु, जिथे मानवी क्षमतांपैकी एक-एक करत सर्वच क्षमता यंत्रांकडे हस्तांतरित होत आहेत, तिथे बर्‍याच मोठ्या मानवी समाजाकडे अकर्तृत्वाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत ज्यांच्या हाती भांडवलाची मालकी, त्यांच्याच हातात प्रचंड प्रमाणात सत्ता एकवटली जाण्याचा धोकाही उद्भवतो. त्याचबरोबर हे सत्तेचे एकवटणे पूर्वीच्या प्रगतीच्या टप्प्यांवर जसे उघड होते, तसे ते तितके या शेवटच्या टप्प्यात राहणार नाही. याचे कारण ही सत्ता कोणत्या भौतिक संपत्तीवरील नाही, तर माहितीसत्ता आहे. व्यक्तींनी स्वतःहून दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या विविध निवडींविषयी नियंत्रणाचा प्रयत्न आजच्या घडीला माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत आहे.
आता कोणालाही मनाविरुद्ध काही करण्यास भाग पाडण्याची आवश्यकता नाही. त्याच्या समाजमाध्यमांवरील वावराला थोडीशी दिशा दिली की, तो व्यक्ती काही काळाने वस्तूंच्या खरेदीविक्रीसंबंधी, एखाद्या पर्यावरणविषयक संवेदनशील विषयाशी संबंधित आस्थापनासंबंधी त्याची मते, एका विशिष्ट दिशेने व्यक्त करू लागतो.

माहिती हे आज एकप्रकारे मनावरील सत्तेचे साधन झाले आहे. यातूनच राष्ट्र, त्यातील सर्व घटकांची सर्वांगीण प्रगती याविषयी खरेखोटे विमर्श पसरवत, समाजघटकांचा बुद्धिभेद केला जातो. तत्कालीन फायद्यांचा विचार करत शाश्वत विकासाच्या तत्त्वाला तिलांजली दिली जाते. भांडवलशाही व्यवस्थेचा गाडा आज निरंकुशपणे भरधाव पुढे चाललेला दिसतो कारण, त्याच्यासमोर असणारे अमर्याद सुखाच्या कल्पनेचे मृगजळ. त्यामुळे या व्यवस्थेत सतत पळणे अभिप्रेत आहे, इथे थांबण्याची संकल्पना नाही. त्यातून पूर्वी जी सत्ता नैसर्गिक संसाधनांचा ताबा मिळवून निर्माण होत असे, ती आता माहितीचा ताबा मिळवून हस्तगत केली जात आहे. या व्यवस्थेच्या गंतव्याविषयी अस्पष्टता आणि तिचे मानवी मूल्यांपासून दूर जाणे, हा जगात चिंतेचा विषय आहेच. पण, निर्वसाहतीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहता या व्यवस्थेतून येऊ घातलेले जागतिक वैचारिक सपाटीकरणही टाळण्याची आवश्यकता आहे. नवीन आर्थिक चिंतनापूर्वी नवीन तात्त्विक चिंतन सिद्ध करावे लागेल.

(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.) 
Powered By Sangraha 9.0