ग्रंथसखी वर्षा

08 Oct 2025 11:54:55

ग्रंथांच्या सहवासातून ग्रंथसंवादाकडे प्रवास करणार्‍या लोकांपर्यंत अभिजात साहित्य पोहोचविणार्‍या वर्षा वासुदेव यांच्याविषयी...

मनाची मशागत हेच माणसाच्या अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार, किती कालसुसंगत आहेत, याची प्रचिती आज आपल्याला येते. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेचे विस्तारणारे क्षितिज, माणसाने विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचा रचलेला नवीन आलेख या सार्‍यांचा एकसमान केंद्रबिंदू म्हणजे ज्ञानदीप. विद्याशाखा कुठलीही असो, त्यामध्ये पारंगत होऊन येणारा काळ आपल्या सृजनातून जगाला नवीन विचार देणार्‍या माणसांचाच असेल, हे वेगळे सांगायला नको. या सृजनाची पाऊलवाट ज्या निबीड अरण्यातून आपल्याला गवसते, ते विश्व असतं पुस्तकांचं. लहानपणी शब्दांच्या जगाशी आपली मैत्री होते, तारुण्यात या पुस्तकांमध्ये आपल्याला सखा भेटतो, तीच पुस्तकं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूरूपाने आपल्यासोबत असतात. पुस्तकांचा हाच विचार नव्या समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणारी ग्रंथसखी म्हणजे वर्षा वासुदेव!

वर्षा चाळीमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. मैदानी खेळांमध्ये रस असलेल्या वर्षा यांना, वाचनाचे संस्कार त्यांच्या घरातूनच लाभले. त्यांच्या वडिलांना पुस्तके खरेदी करण्याची आवड आहे; तसेच त्यांच्या आई एक उत्तम वाचक आहेत. आपल्या मुलांमध्ये सृजनाचा विकास व्हावा, त्यांनी कलेच्या सौंदर्याला आपलेसे करावे, यासाठी काही कालावधी त्यांच्या वडिलांनी त्यांना टीव्हीपासून दूरच ठेवले. अर्थात याचा व्हायचा तो सकारात्मक परिणाम झालाच. वर्षा यांना वाचनाची गोडी लागली, तर त्यांच्या भावाला संगीत जवळचे वाटू लागले. आईवडिलांच्या काहीशा कठोर वाटणार्‍या कृतीमागेसुद्धा, मुलांच्या उत्कर्षाचा विचार असतो हे यातून दिसते.

घराप्रमाणेच वर्षा यांच्या वाचनप्रेमाचं बीज त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये दडले आहे. शाळेत असल्यापासून वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद जडला, व त्या शब्दांच्या विश्वामध्ये रममाणही झाल्या. वक्तृत्व, कथाकथन, वादविवाद स्पर्धा, संस्कृत श्लोकांचे पाठांतर आदी विषयांमुळे, स्वतःला सातत्याने घडवण्याचा मार्ग त्यांना सापडत राहिला. व. पु. काळे यांचे एक वाक्य आहे “आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल जेव्हा दुसर्‍याशी बोलतो, तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं.” शालेय जीवनापासूनच वर्षा यांना हा मंत्र गवसला आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करणे, बोलणे त्यांनी सुरू केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनामध्ये नाटकाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा सूर सापडला. त्यामुळे नाटकाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा वाचनाचा प्रवास सुरू झाला. नाटकामुळे साहित्याची गोडी आणखीनच वाढली.

त्यांच्या वाचनातील प्रवासाची पुढची पायरी होती संवादाची. समाजमाध्यमांचा यथायोग्य वापर करून वाचत असलेल्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल माहिती मिळवत त्यांनी आपले विचार जगापर्यंत पोहोचवले. एक वाचक ज्या प्रकारे चांगल्या लेखकाच्या शोधात असतो, अगदी त्याच प्रकारे लेखकसुद्धा चांगल्या वाचकांच्या शोधात असतो. यांच्यातील संवादाचे वर्तुळ पूर्ण झाल्यानंतरच नव्या विचारांच्या दिशा गवसतात. लिखाणाच्या स्वरूपात लोकांसमोर येणार्‍या वर्षा यांनी, दृश्यात्मक स्वरूपात लोकांशी जोडण्याचा विचार केला आणि यातून ‘द बुक बीन’ हा नवीन प्रकल्प आकाराला आला. रील्स्, व्हिडिओ हे मजकूर आज लोकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण साधन नसून, डिजिटल युगात युवकांना त्यांच्या व त्यांच्या भोवतालच्या उत्कर्षासाठी लाभलेली नवीन संधी आहे.

वर्षा या समाजमाध्यमांवर सक्रीय झाल्या. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या बहिणीचीही त्यांना भक्कम साथ मिळाली. त्याचबरोबर ‘बाईचीया’ कविता लिहिणारे प्रख्यात कवी किरण येले, यांचेसुद्धा मार्गदर्शन त्यांना लाभले. आपला वाचन प्रवास लोकांपर्यंत पोहोचवताना, कुठल्या प्रकारची पुस्तके वाचली जावीत, पुस्तक वाचनावर लोकांच्या प्रतिक्रिया या सार्‍या गोष्टींचा मिलाफ त्यांच्या मजकुरामध्ये आपल्याला दिसून येते. ‘द बुक बीन’ या प्रकल्पाच्या माध्यमातून या विस्तारीत वाचनसमूहाची निर्मिती त्यांना करायची आहे. वर्षा यांना आगामी काळात वाचन, मानसिक आरोग्य आणि आत्मस्वीकृती यांना जोडणारे उपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. वर्षा यांच्या मते, “शब्द फक्त कथा सांगत नाहीत, तर माणसाला समजून घेण्याची ताकदसुद्धा देतात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आतल्या आवाजाची भाषा कळते,” असे मत वर्षा यांनी व्यक्त केले.

हल्लीची पिढी वाचत नाही, हे विधान सर्वसाधारणपणे युवकांच्या माथी मारले जाते. मात्र, हा गैरसमज पुसण्याचे काम वर्षा यांना ‘द बुक बीन’च्या माध्यमातून करायचे आहे. वर्षा यांनी दिवाळी अंकामध्ये लेखन करायला सुरुवात केली असून, एक लेखिका म्हणूनसुद्धा त्यांचा प्रवास सुरू झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, झोपडीपट्टीमध्ये राहणार्‍या मुलांना शिकवण्याचे कार्यसुद्धा काही काळ केले. संस्कार वर्गाच्या माध्यमातूनही मुलांना घडवण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. विविध समाजमाध्यमांवर त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. वाचकसमूहाला उत्तरोउत्तर विस्तारीत करताना, वाचनसंस्कृतीचा अभिजात मराठी भाषेचा उत्कर्ष व्हावा ही भावना घेऊन, काम करणार्‍या वर्षा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनापासून शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0