आपल्या देशात कर्तृत्वत्वान राजे, महाराजे, राणी होऊन गेल्या; पण ते सगळे आपल्या विस्मृतीत गेले. कारण, आपल्याला कधीही त्यांची महत्ता शिकवली नाही. आज आपण अशाच एका कर्तृत्वत्वान राणीचा इतिहास जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील चंदेल वंशाचा राजा किर्तीदेवसिंह याची एकुलती एक पुत्री राणी दुर्गावती. दुर्गाष्टमीला जन्मली म्हणून ‘दुर्गावती’. सर्वच कलांमध्ये पारंगत असलेली १३-१४ वर्षांची राजकन्या न डगमगता एकाच बाणात वाघाची शिकार करत असे. मदमत्त झालेल्या हत्तीला शांत करून त्यावर बसून फेरफटका मारी.
अशा या राजकन्येचा विवाह कोणाशी करावा, असा राजाला प्रश्न पडलेला असताना ती म्हणे, “ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान मुघलांच्या पायाशी ओलीस ठेवला, अशा कुठल्याही राजकुमाराशी मला विवाह करायचा नाही. त्यापेक्षा परजातीत असलेले गडा राज्याचे राजकुमार दलपत शाह यांच्याशी मी विवाह करेन, ज्यांनी गोंड जातीतले असूनही कर्तबगारीने स्वराज्याचे रक्षण केले आहे व हिंदू संस्कृती जागी ठेवली.” अशी ही राणी जिने आपल्या पित्याला युद्धात साथ दिली, पतीच्या बरोबरीने युद्धसंग्रामात ती उतरली.
३९ वर्षांच्या आयुष्यात ५२ लढाया लढलेली राणी, ज्यात तिने ५१ लढायांमध्ये विजय मिळवला व शेवटच्या ५२व्या लढाईत बलिदान दिले.
राणीच्या राज्यात उत्तम प्रशासन व्यवस्था व सोपी करप्रणाली असे. ओला किंवा सुका दुष्काळ पडला, तर ती सगळ्यांना करमाफ करीत असे. राजा दलपत शाह व राणी दुर्गावतीचे गडा राज्य एवढे विशाल होते की, त्यात ३५ हजार गावे होती. संपूर्ण राज्य ५२ किल्ल्यांमध्ये विभागलेले होते.
अशा या विशाल राज्याची राणी अतिशय दूरदृष्टी असलेली व चाणाक्ष होती. दिल्लीचा सम्राट अकबर याची वाकडी नजर तिच्या राज्यावर पडली. त्याने राणीला खलिता पाठवला. तो म्हणतो, “तू एक स्त्री आहेस. तुला राज्य करणे शोभत नाही. तू माझ्या जनानखान्याची शोभा वाढव व तुझा सरदार आधारसिंग आणि तुझा पांढरा हत्ती समरन यांना संमती म्हणून माझ्याकडे पाठवून दे.” राज्यावर प्रचंड मोठे संकट आहे, हे जाणूनही राणीने स्वाभिमानाने अकबराचा प्रस्ताव धुडकावला आणि त्याला ठणकावून सांगितले, “माझ्या राज्याचे रक्षण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करेन. तुम्हा कोणालाही माझे राज्य गिळंकृत करू देणार नाही.”
तिची शेवटची लढाई अकबराचा सेनापती आसिफखानसोबत झाली. त्यावेळच्या सर्व सामाजिक परिस्थितीची तिला जाण होती. त्यामुळे लढाईत मुलगा वीर नारायण जखमी झाल्यावर त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवताना तिने त्याला एकच सांगितले, “जर मी परत आले नाही, तर गडातील सर्व स्त्रियांचे रक्षण कर व अगदीच बिकट परिस्थिती आली, तर त्यांना जोहर करायला तयार कर, पण मुघलांच्या हातात हिंदूंची एकही स्त्री पडू देऊ नको.”
जेव्हा शेवटी युद्ध करताना तिच्या डोळ्यात बाण लागला, तो तिने खेचून बाहेर काढला. पुन्हा मानेत बाण लागला, त्यावेळेस सेनापती आधार सिंहला समोर बोलावून तिने त्याला सांगितले की, “आता माझा शेवट आलेला आहे. पण माझे शवसुद्धा शत्रूच्या हाती पडता कामा नये. तेव्हा माझ्या छातीत खंजीर खुपस!” पण, आधार सिंहची हिंमत होईना. राणीने स्वतः खंजीर आपल्या हाती घेतला आणि स्वतःच्या छातीत मारला. तेव्हा ती खाली पडली असताना तिचा हत्ती समरन हा तिच्या शवावर आडवा पडला व त्याने आपल्या देवीची मृत्यूनंतरही रक्षा केली.
आजही जबलपूर व मंडला गावांच्यामध्ये नरई नाला या गावात राणी दुर्गावती व तिचा हत्ती समरन यांची समाधी आहे. दि. ५ ऑक्टोबर १५२४ हा राणीचा जन्मदिवस आज ५०१ वर्षांनंतरही स्थानिक लोक तेथे राणीची पूजा करतात. राणीच्या निधनानंतर गडा राज्यातील २५ हजार स्त्रियांनी एक साथ जोहर केला. जेव्हा आसिफ खान तेथे पोहोचला, तेव्हा त्याला निव्वळ राख हाताला लागली. अशी ही विरांगना राणी दुर्गावती आपण सदैव आपल्या प्रातःस्मरणात ठेवली पाहिजे.