मुंबई : "संघाची खरी शक्ती म्हणजे दररोजची एक तासाची शाखा, हाच संघाचा उर्जास्रोत आहे.", असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगरचा विजयादशमी उत्सव किरण नगर येथील नरसम्मा महाविद्यालयाच्या परिसरात नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू आणि महानगर संघचालक उल्हास बापोरिकर हे देखील उपस्थित होते.
उपस्थिताना संबोधत जे नंदकुमार म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच अनुशीलन समितीत सक्रिय सहभाग घेतला होता. ही समिती विविध प्रकारे कार्य करणाऱ्या देशभक्तांचा समूह होती. त्यात डॉक्टर हेडगेवार यांचे योगदान अमूल्य होते. देशाच्या पारतंत्र्यतेची कारणे शोधताना त्यांच्या नजरेसमोर भाषा, प्रांत आणि जातीनुसार विभागलेले समाजचित्र आले आणि तेव्हाच त्यांनी व्यक्ति-निर्माणाचे कार्य करण्याचा संकल्प केला. स्वामी विवेकानंद यांनी परदेशात दिलेल्या भाषणांत जगाला केवळ एका देवतेची 'भारतमातेची' उपासना करण्याचे सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एका विदेशी विद्यापीठात सादर केलेल्या संशोधनप्रबंधात भारतीय संस्कृती व तिच्या मूल्यांचा गौरव केला होता.
पुढे ते म्हणाले की, १९२५ मध्ये लावलेले संघाचे बीज आज वटवृक्ष रूपाने फोफावले आहे. कोणतीही राजकीय विचारधारा संघाची ताकद नाही. संघ वाढत असताना त्याने कुठलेही आक्रमक कार्यक्रम केले नाहीत. ज्या क्षेत्रात स्वयंसेवकांना उणिवा जाणवल्या, तिथे त्यांनी स्वयंस्फूर्तपणे काम सुरू केले आणि तेथून विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम अशा अनेक समर्पित संघटनांची निर्मिती झाली.
निस्वार्थ सेवाभाव हाच यशाचा मंत्र
शताब्दीभर चाललेल्या शाखा कार्यातून आज देशाच्या सर्वोच्च पदी, म्हणजे पंतप्रधान पदावर, एक बाल स्वयंसेवक पोहोचला आहे. त्यामागे समर्पण आणि निस्वार्थ सेवाभाव हाच यशाचा मंत्र आहे. ‘पंच परिवर्तन’ साधत प्रत्येक कुटुंबात हिंदू संस्कृतीचे मूल्य पुन्हा जागृत करणे अत्यावश्यक आहे. भजन, भोजन आणि भ्रमण यात हिंदू संस्कृतीची मूल्ये जपली गेली पाहिजेत, असे जे नंदकुमार यांनी सांगितले.
भारत एक हिंदू राष्ट्र होता, आहे आणि भविष्यातही राहील.
जे नंदकुमार यावेळी म्हणाले, १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हा ना कोणतेही पद होते, ना कोणताही नेता, ना सचिव. तरीही संघ आपल्या विचारांशी निष्ठावान राहिला आणि त्या विचारांच्या बीजापासून आज वटवृक्षासारखे संघटन उभे राहिले आहे. ही एक सजीव, जैविक घटना आहे. संघ भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी अविरतपणे कार्य करत आला आहे. आमचा दृढ विश्वास आहे की भारत एक हिंदू राष्ट्र होता, आहे आणि भविष्यातही राहील.
डॉ. कमलताई गवई यांचा शताब्दीनिमित्त शुभेच्छा संदेश
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहू न शकल्याने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई डॉ. कमलताई गवई यांनी विजयादशमी व संघ शताब्दीच्या शुभेच्छा देणारा संदेश यावेळी पाठवला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “मानव जीवन हे मानवी मूल्यांवर विकसित झाले आहे आणि भारतीय संस्कृती व सभ्यता या जगात सर्वोच्च आहेत. भारत प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जगासाठी एक आदर्श राहिला आहे. तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, रामास्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महापुरुषांनी भारतात मानवी मूल्यांची एक महान परंपरा निर्माण केली आहे. डॉ. आंबेडकरांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर भारतीय संविधानाची निर्मिती केली, ज्यामुळे आज भारत आणि त्याचे नागरिक प्रगतीच्या मार्गावर आहेत. भारत सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेने नटलेला देश आहे आणि आजही तो लोकशाही मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रगती करत आहे. भारताला एक अखंड आणि समर्थ राष्ट्र म्हणून घडवायचे आहे, आणि ते समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षतेद्वारेच शक्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसमोरही या मानवी आणि घटनात्मक मूल्यांच्या माध्यमातून भारताला समर्थ राष्ट्र बनवण्याची मोठी संधी आहे.