सबरीमला द्वारपाल सोने गहाळ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

07 Oct 2025 16:51:53

नवी दिल्ली : सबरीमला मंदिरातील द्वारपालक मूर्तींवरील सोने गहाळ झाल्याच्या आरोपांवर केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती के.व्ही. जयकुमार यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

न्यायालयाने या तपासासाठी केरळ पोलिसांतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) एच. वेंकटेश यांची एसआयटी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, या संवेदनशील प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे.

ही कारवाई त्या पार्श्वभूमीवर करण्यात आली की, सोन्याचे पत्रे चढविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या (टीडीबी) अध्यक्षांना ईमेल करून विचारले होते की, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर उरलेले सोने तो एका लग्नासाठी वापरू शकतो का?. न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली होती, कारण सोन्याचे पाणी चढविलेल्या तांब्याच्या पत्र्यांची दुरुस्ती न्यायालयास किंवा सबरीमाला विशेष आयुक्तास पूर्वकल्पना न देता करण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात सोने गायब झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

तपासात असेही उघड झाले की, टीडीबीने हे पत्रे चेन्नईस्थित स्मार्ट क्रिएशन्स या फर्मकडे दुरुस्तीकरिता उन्नीकृष्णन पोट्टी या भक्तामार्फत पाठविले होते. पोट्टीकडे सुपूर्द करण्यात आलेल्या वस्तूंचे वजन ४२.८ किलो होते, परंतु फर्मकडे पोहोचलेले वजन फक्त ३८ किलो नोंदविण्यात आले. जवळपास ४.५४ किलोची तफावत अंतर न्यायालयाने अत्यंत गंभीरतेने घेतले.

१७ सप्टेंबर रोजी न्यायालयाने तपासाचे आदेश दिल्यानंतर मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या अहवालात आणखी धक्कादायक बाब उघडकीस आली. उन्नीकृष्णन पोट्टी यांच्या बहिणीच्या घरी सोन्याने मढविलेल्या काही वस्तू सापडल्या, ज्यांची नोंद टीडीबीच्या नोंदवहीत नव्हती. अहवालात देवस्वोम बोर्डाच्या रजिस्टरमध्ये गंभीर विसंगती असल्याचे नमूद करण्यात आले – जसे की सोन्याच्या दागिन्यांचे अपूर्ण दस्तऐवजीकरण, तिरुवाभरणम डायरीतील नोंदी गायब होणे आणि दुरुस्तीकरिता पाठविलेल्या मौल्यवान वस्तूंचे रेकॉर्ड नसणे.

या पार्श्वभूमीवर, गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती के.टी. शंकरन यांना सबरीमाला मंदिरातील सर्व मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात केवळ पोट्टीच नाही तर संबंधित अधिकारीही गुन्ह्यांत सामील असल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी एसआयटीमार्फत तपास होणे आवश्यक आहे.


Powered By Sangraha 9.0