उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीचे बांधकाम तोडतांना इमारतीचा भाग कोसळला!
07-Oct-2025
Total Views |
उल्हासनगर : जीवघेण्या निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. कॅम्प क्रमांक ५, सेक्शन ३९ येथील साईबाबा मंदिरासमोर रविवारी ‘हरिओम पॅलेस’ नावाची पाच मजली धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला. अचानक जोरदार आवाजासह इमारतीचा एक मोठा भाग कोसळून थेट हायव्होल्टेज वीजवाहिन्यांवर पडला, ज्यामुळे तारा खांबासकट तुटून खाली कोसळल्या. भीषण आवाज आणि ठिणग्यांच्या स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. क्षणभरातच नागरिक घाबरून बाहेर धावले, परंतु सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
उल्हासनगर महापालिकेकडून कॅम्प नंबर ५ येथील साईबाबा मंदिरासमोरील दोन धोकादायक इमारती पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील एक इमारत आधीच जमीनदोस्त करण्यात आली होती, तर दुसरी ‘हरिओम पॅलेस’ पाडण्याचे काम सुरू होते. कामादरम्यान अचानक इमारतीचा एक भाग जोरात कोसळला आणि थेट वीजवाहिन्यांवर आदळला. क्षणार्धात वीजतारा तुटून रस्त्यावर आल्या आणि ठिणग्या उडताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या वेळी परिसरात नागरिक किंवा कामगार उपस्थित नसल्याने गंभीर हानी टळली.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. एका कर्मचाऱ्याने सांगितले, “जर महापालिकेकडून या पाडकामाची पूर्वसूचना मिळाली असती, तर आम्ही आधीच वीजपुरवठा खंडित करून आवश्यक सुरक्षा उपाय करू शकलो असतो. पण आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.” या निष्काळजीपणामुळे परिसरातील दुकानदार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभाग समिती क्रमांक ४ च्या सहाय्यक आयुक्त अलका पवार यांनी सांगितले, “घटनास्थळी कर्मचाऱ्यांना पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने वीज विभागाला पाडकामाबाबत लेखी सूचना पूर्वीच दिली होती.” असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पाडकामाच्या वेळी कोणतेही सुरक्षा कुंपण, पोलिस बंदोबस्त किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित नव्हते.