नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या जनसेवेच्या २५व्या वर्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. त्यांनी २००१ साली याच दिवशी प्रथमच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्र त्यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले – “२००१ मध्ये आजच्याच दिवशी मी प्रथमच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. देशवासियांच्या अखंड आशीर्वादामुळे मी सरकारच्या प्रमुखपदावर सेवा देत २५व्या वर्षात प्रवेश करत आहे.”
त्या काळाची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने त्यांना अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. त्या वर्षी गुजरात भूकंपाच्या भीषण संकटातून सावरत होता, तर काही वर्षांपूर्वी राज्याने महाचक्रीवादळ, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेचा सामना केला होता. या सर्व संकटांनंतरही जनसेवेचा आणि गुजरातच्या पुनर्निर्माणाचा त्यांचा निर्धार अधिक बळकट झाला, असे मोदींनी नमूद केले.
मोदींनी आपल्या आईंच्या शब्दांची आठवण करत भावनिक क्षणही त्यांनी सांगितला. “मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या आई म्हणाल्या होत्या – मला तुझ्या कामाचं फारसं ज्ञान नाही, पण दोन गोष्टी लक्षात ठेव – एक, नेहमी गरीबांसाठी काम कर आणि दोन, कधीही लाच घेऊ नको. मीही तेव्हा लोकांना सांगितलं होतं की, माझं प्रत्येक कार्य शुद्ध हेतूनं आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी असेल,” असे त्यांनी लिहिले.
२५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेताना मोदी म्हणाले की, गुजरातच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात लोकांनी सोबत दिली आणि राज्याला सुशासनाचं केंद्र बनवलं. एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेलं गुजरात आज कृषी क्षेत्रात अग्रणी ठरलं आहे. औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रातही राज्याने उल्लेखनीय प्रगती केली. “नियमित कर्फ्यू आता इतिहास झाला असून सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे,” असे मोदींनी नमूद केले.
२०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारपदी घोषित केले, त्या काळाची आठवण करत मोदी म्हणाले की, त्या वेळी देश विश्वास आणि प्रशासनाच्या संकटात अडकला होता. “तेव्हाच्या यूपीए सरकारकडे भ्रष्टाचार, नातेसंबंधवाद आणि निर्णयक्षमतेचा अभाव या सर्वच बाबतीत वाईट उदाहरण म्हणून पाहिलं जात होतं. पण भारताच्या जनतेने आमच्या गठबंधनावर विश्वास दाखवला आणि तीन दशकांनंतर देशाला स्थिर पूर्ण बहुमताचं सरकार दिले,” असे ते म्हणाले.
गेल्या ११ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाबद्दल बोलताना मोदींनी सांगितलं की, भारताने या काळात आमूलाग्र परिवर्तन अनुभवले आहे. “आपल्या संयुक्त प्रयत्नांनी महिलाशक्ती, युवाशक्ती आणि मेहनती शेतकऱ्यांना सशक्त केलं आहे. २५ कोटींहून अधिक लोक गरीबीरेषेबाहेर आले आहेत आणि भारत आता जगातील प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे,” असे त्यांनी नमूद केले.