मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मुस्लिम संघटना जमीयत हिमायतुल इस्लामने केली आहे. या संदर्भातील एक पत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कारी अबरार जमाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. हेडगेवार यांनी भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांनी समाजात एकता, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ केली. डॉ. हेडगेवार यांनी शंभर वर्षांपूर्वी जे बीज रोवले, ते आजही फुलत आहे. हजारो संघ स्वयंसेवक डॉक्टरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत देशसेवा करतायत. संघ ही देशात शांती आणि परस्पर ऐक्याची भावना जागवणारी सर्वात अग्रणी संस्था आहे. काँग्रेसने नेहमी मुस्लीम समाजाला संघाच्या नावाने घाबरवून मत मिळवण्याचा प्रयत्न केला. संघाबद्दल गैरसमज पसरवला गेला. तो दूर करणे हा आमचा प्रयत्न आहे.
यापूवी भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते संघप्रिय राहुल यांनीही डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी केली होती.