
मुंबई : साऊथचा नवा सुपरस्टार म्हणून अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीकडे सध्या पाहिलं जात आहे. २०२२ मध्ये आलेल्या कांतारा या चित्रपटानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर फक्त साऊथच नाही तर जगभरात कांतारा आणि ऋषभची चर्चा झाली. कांताराच्या यशानंतर त्याने सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘कांतारा: चॅप्टर १’ची घोषणा केली होती. नुकतंच २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ऋषभला या दोन्ही चित्रपटांसाठी त्याच्या पत्नीची खंबीर साथ मिळाली आहे. त्यामुळे याचनिमित्ताने दोघांच्या लव्हस्टोरीची देखील चर्चा होतेय. कोण आहे ऋषभची पत्नी प्रगती शेट्टी? त्याच्या कुटुंबात कोण-कोण आहेत, त्याच्या लग्नाची कहाणी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, ऋषभ शेट्टीने २०१७ मध्ये प्रगती शेट्टीशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रणवीत आणि राध्या अशी त्यांची नावं आहेत. ऋषभची पत्नी प्रगती ही कॉस्च्युम डिझायनर आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ आणि आताच्या ‘कांतारा: चॅप्टर १’ साठी तिनेच कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. ऋषभ आणि प्रगतीची प्रेमकहाणीसुद्धा खूपच हटके आहे. प्रगतीच्या कुटुंबियांना सुरुवातीला दोघांचं नातं अजिबात मान्य नव्हतं. अर्थातच त्या वेळी ऋषभचं सिनेविश्वात नाव नव्हतं. तो त्याचा स्ट्रगलिंगचा काळ होता.
‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभने सांगितलं होतं की, “या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीने खूप साथ दिली होती. चित्रपटात एखादं कठीण साहसदृश्य असेल तर ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. शूटिंगमुळे मी अनेक महिन्यांपर्यंत घरी जाऊ शकत नव्हतो. भावनिकदृष्ट्या तिने माझी खंबीर साथ दिली. मुलांचीही देखभाल तीच करायची.”
एका मुलाखतीत ऋषभ त्याच्या संघर्षाबद्दल म्हणाला, “प्रत्येकाला एक वेगळा संघर्ष असतोच. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला एका प्रक्रियेतून जावं लागतं. मी माझ्या संघर्षाला एक प्रक्रिया मानतो. मी लहान-मोठी सर्व कामं केली आहेत. मी पाण्याच्या बाटल्या विकायचो. मी रिअल इस्टेट आणि हॉटेलमध्येही काम केलंय. इंडस्ट्रीमध्ये मी क्लॅपर बॉयपासून सुरुवात केली. अनेक लहान भूमिका केल्या. पण कधीही कोणतंही काम मी कमी लेखलं नाही. मला अजूनही माझी पहिली कमाई आठवते. मी पाण्याच्या बाटल्या विकून २५ रुपये कमावले होते.”
ऋषभ आणि प्रगतीची पहिली भेट एका चित्रपटाच्या कार्यक्रमात झाली होती. त्याच्या काही आठवड्यांनंतर दोघं फेसबुकवर चॅट करू लागले होते. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रुपांतरित झाली. प्रगतीचे कुटुंबीय तिच्या रिलेशनशिपच्या विरोधात होते, असंही म्हटलं जातं. कारण तेव्हा ऋषभला चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नव्हतं. तो संघर्षच करत होता. अखेर आईवडिलांची मनधरणी केल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं. ऋषभ आणि प्रगती यांचा सुखाचा संसार सुरु आहे. अनेकदा सोशल मीडियावर ते आपले फोटो शेअर करत असतात. तर ऋषभच्या चाहत्यांकडून नेहमीच या जोडीचं कौतुक केलं जातं.
‘कांतारा: चॅप्टर 1’मध्ये प्रगतीनेसुद्धा छोटासा कॅमिओ केला आहे. अगदी काही सेकंदाच्या सीनमध्ये ती दिसली आहे. पण प्रेक्षकांनी प्रगतीला ओळखलंच. राजाच्या पत्नीच्या भूमिकेत ती आहे. प्रगतीने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारल्याचं लगेच प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगासुद्धा होता.