आपले पाल्य निरोगी राहावे, म्हणून प्रत्येक पालक जीवापाड त्याची काळजी घेत असतो. तरीही वातावरणातील बदलांचा परिणाम जसा मोठ्यांवर होतो, तसाच तो लहानग्यांवरही दिसतो. त्यामुळे सर्दी, खोकला होणे ही बालकांमध्ये सामान्य बाब झाली आहे. त्यावर डॉक्टर औषधे देतात आणि बालकांचा आजार दूर होतो. पण, डॉक्टरांनी सूचवलेल्या औषधांचा परिणाम विपरीत होऊन, बालकांच्या जीवावर बेतल्यास? असेच काहीसे नुकतेच घडले मध्य प्रदेशमध्ये.
मध्य प्रदेशच्या छिंदवडा येथे कोल्ड्रिफ या औषधाच्या सेवनाने दहा मुलांचा मृत्यू झाला तर राजस्थानमध्येही काही बालके या औषधाच्या सेवनाने दगावली आहेत. या घटनांकडे वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतेही औषध तयार करताना त्यातील घटकांची गुणवत्ता, प्रमाण आणि औषधनिर्मितीतील निर्जंतुकीकरणाची पातळी यांचा बालकांच्या शरीरावर थेट परिणाम होतो. विशेषतः दोन ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये ‘मेटाबॉलिक’ आणि ‘डिटॉक्सिफिकेशन सिस्टम’ ’पूर्ण विकसित झालेली नसल्याने, काही औषधी द्रव्यांचे अपघाती प्रमाणात सेवनही शरीराला अपायकारक ठरू शकते.
‘कोल्ड्रिफ’ औषधातून झालेल्या विषबाधेनंतर प्राथमिक वैद्यकीय तपासात असे दिसून आले की, या सिरपच्या काही बॅचमध्ये ‘डायएथिलीन ग्लायकॉल’ हा द्रव पदार्थ आढळून आला. ‘डायएथिलीन ग्लायकॉल’ या घटकाचे प्रमाण त्या औषधामध्ये जवळपास 48 टक्के होते. हा घटक मूत्रपिंडावर विपरीत परिणाम करतो, त्यामुळेच लहान मुलांमध्ये प्राणघातक स्थिती निर्माण होते. बालकांच्या शारीरिक संवेदनशीलतेमुळे त्यांची औषधांवरील प्रतिक्रिया ही अतिशय तीव्र अशीच असते. या विषारी घटकांमुळे मूत्रपिंडांमध्ये ‘क्रिस्टल’ निर्माण होण्याचा धोकाही वाढतो.
प्रसंगी मूत्रपिंड निकामी होण्यासारखे धोकेही संभवतात. या घटनेतही दाखल झालेल्या रुग्णांमध्येही मूत्रपिंडाचा त्रास दिसून आला होता.
‘डायएथिलीन ग्लायकॉल’ हा घटक हा रंगहीन, गंधहीन, चवीला गोडसर असलेला द्रव पदार्थ औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरला जातो. रंगनिर्मिती, ब्रेक फ्ल्युएड, प्लास्टिक आणि अॅण्टिफ्रिझसाठीच्या सर्व औद्योगिक उत्पादनामध्ये ‘डायएथिलीन ग्लायकॉल’चा वापर केला जातो. मानवी शरीरासाठी हा पदार्थ विषारीच! औषधनिर्मितीमध्ये गळतीने किंवा ग्लिसरीनसारख्या सुरक्षित द्रव्याच्या जागी भेसळ म्हणून याचा वापर केला जातो. असा विषारी पदार्थ जेव्हा लहान मुलांच्या शरीरामध्ये जातो, तेव्हा त्यांचे शरीर त्यावर योग्य प्रक्रिया करू शकत नाही.
डायएथिलीन ग्लायकॉल बालकांच्या शरीरात गेल्यावर हळूहळू त्यांच्या मूत्रपिंडाना निकामी करण्यास सुरुवात करते. बालकांच्या शरीरातील पाण्याची पातळी घटते, उलटी, पोटदुखी श्वास घेण्यास त्रास अशा अनेक प्रकारचा त्रास या बालकांना होतो. परिणामी मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वैद्यकीयदृष्ट्या पाहता, एखादे औषध सुरक्षित आहे की नाही, हे फार्माकोव्हिजिलन्स या प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. औषध तयार झाल्यानंतर त्याचे दीर्घकालीन परिणाम, दुष्परिणाम आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास सतत केला गेला पाहिजे. भारतातही ही व्यवस्था कार्यरत आहे. मात्र, बालकांसाठी वापरल्या जाणार्या औषधांबाबत अधिक संवेदनशील दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे.
यासाठी औषधे निर्मात्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा पालक लहान मुलांचा खोकला किंवा सर्दी पाहून तत्काळ बाजारातील कोणतेही कफ सिरप वापरतात. पण, बालरोगतज्ज्ञांच्या मते, बहुतांश वेळा सर्दी-खोकला ही व्हायरल स्वरूपाची असल्याने, त्यासाठी कोणत्याही अॅण्टिबायोटिक किंवा अन्य औषधांची गरजच नसते. शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारेच या संक्रमणाविरोधात लढा दिला जाऊन, रुग्णाला दोन ते तीन दिवसांतच बरेही वाटते. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि पालक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. प्रत्येक बालरुग्णासाठी औषधाचे डोस रुगणाचे वजन, वय आणि वैयक्तिक शारीरिक स्थितीनुसार ठरवणे आवश्यक आहे.
प्रत्येक माणासाचे शरीर वेगवेगळे असल्याने, एकाच औषधाचा समान डोस दोन वेगवेगळ्या रुग्णांवर वेगवेगळा परिणाम करूच शकतो, ही शक्यताही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘एकदा डॉक्टरांनी दिले होते, आता पुन्हा देऊ,’ असा विचार याठिकाणी धोकादायक ठरू शकतो. ‘कोल्ड्रिफ’ सिरपसारख्या साध्या वाटणार्या औषधातून गंभीर परिणाम घडल्याचे उदाहरण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक इशारा आहे की, कोणतेही औषध हे नेहमीच दुधारी तलवार असते. योग्य त्याच्या निर्मितीपासून सेवनापर्यंत काळजी न घेतल्यास रुग्णाच्या प्राणावरही बेतू शकते.