मुंबई : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. अशातच आता प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर सक्रिय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यासोबतच्या भेटीनंतर मैथिली ठाकूर २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मैथिली ठाकूर हिने नुकतीच गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मैथिलीचे वडिल देखील उपस्थित होते. भाजप नेते विनोद तावडे यांनी रविवारी या भेटीचे फोटो एक्स वर शेअर केले. यात ते म्हणाले की, "१९९५ मध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आले, तेव्हा बिहार सोडून गेलेल्या कुटुंबातील कन्या आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, या बदलत्या बिहारची प्रगती पाहून पुन्हा बिहारमध्ये येऊ इच्छित आहेत. नित्यानंद राय आणि मी त्यांना आग्रह केला आहे की, त्यांनी बिहारच्या लोकांसाठी आणि त्याच्या विकासासाठी योगदान द्यावे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात."
दरम्यान मैथिली यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले कि, "जर तिला निवडणुक लढवण्याची संधी मिळाली, तर तिला तिच्या गावातून निवडणुकीला उभे राहायला आवडेल. मात्र या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही", असे तिने स्पष्ट केले आहे.