ज्यांची प्रगती पाहून शेकडो लोकांनी प्रगतीचा मार्ग अंगीकारला आणि जव्हारमधील अनेक घरांत सुख नांदू लागले, अशा महादू भोये यांच्याविषयी...
मोगरा, सोनचाफा, आंबे, काजू आणि पालेभाज्या यांची शेती करून, जव्हारमध्ये प्रगतशील आणि संपन्न शेतकरी म्हणून नावलौकिक मिळालेले कोंकणा समाजाच्या महादू सखाराम भोये यांच्यामुळे, गावातील शेकडो समाजबांधवांना प्रेरणा मिळाली. धरित्रीने दिलेले आपण कसं विकायचं? अशी मानसिकता असलेले शेकडो आदिवासी बांधव, शेती व्यवसायात प्रगती करू लागले. महादू हे माळकरी. दारू पिणे हे आजकाल निषिद्ध नाही. मात्र, महादू यांनी दारू सोडली आणि पूर्णपणे घर, संसार शेतीव्यवसायात रमल्याने त्यांची झालेली प्रगती पाहून गावातील अनेकांनी दारू सोडली.
पाड्यात काही विघातक विचारांची लोक, आदिवासी समाजाच्या श्रद्धेवर प्रहार करतात. ’आपण हिंदू नाहीत आणि त्यांचे देवही आपले नाहीत,’ असे भोळ्या समाजाला सतात सांगत असतात. या अशा वातावरणातही महादू भागवत सप्ताहाचे आयोजन करतात. गावकरी श्रद्धेने त्यात सामीलही होतात. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्माविषयीची नाळ आणखीन घट्ट होते.
जव्हारच्या कोकदा खेड्याचे सखाराम आणि रखमा भोये हे दाम्पत्य. त्यांना चार अपत्य, त्यांपैकीच एक म्हणजे महादू. भोयेंची स्वतःच्या मालकीची जमीन होती पण, पारंपरिक आणि पावसाच्या मेहरबानीवर अवलंबून असलेल्या शेतीमुळे, शेतीचे उत्पन्न असून नसल्यासारखेच. त्यामुळे कुटुंबाची अनेकदा उपासमार होत असे.
छोटे महादू आईबाबाबरोबर शेतमजुरी करायला जात किंवा गुरेढोरे वळायला जायचे. गुर वळायला जंगलात जाताना चारपाचजण मिळून जायचे. तरीही अनेकदा जंगलात वाघाचा सामना होई आणि वाघ एखादी तरी बकरी उचलून नेई. तसेच पाड्यातलं घर म्हणजे, तिथे माणसांचा आणि सापांचाही वावर. सापावर पाय दिला नाही, त्याला डिवचलं नाही तर तो चावत नाही, हे भोये कुटुंबासह संपूर्ण पाड्याचे मत. भगत, करणी वगैरेवर तर गावचा विश्वास होताच; तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महादू मोठे होत होते. त्यांचे आईबाबा सांगत दुसर्याच्या वस्तूवर कधीच हक्क सांगायचा नाही, ते पाप आहे. हेच संस्कार लहानपणापासून महादू यांच्यावर झाले.
असो! महादू दुसरीपर्यंत शाळा शिकले. पुढे त्यांनी आईवडिलांना कामात मदत करण्यास सुरुवात केली.
जरा मोठे झाल्यावर ते इतरांसारखे शहराबाहेर काम करायला लागले. अगदी १५ वर्षे त्यांनी पावसाळा सोडून इतर महिने, शहरांत जाऊन मजुरी केली. पण, अहोरात्र राबूनही पोटाचेही प्रश्न सुटत नव्हते. अशातच एक घटना घडली.
पावसाळ्यात पिकपाणी वाहून जाते, एकवेळची भाकरीही मिळत नाही म्हणून, महादू शहरात मजुरीसाठी गेले. डोळ्यात आणि मनात फक्त भाकरीचं स्वप्न होतं. काही मजुरी केली की पाड्यावर यायचे. मिळालेल्या पैशात पावसाळ्याचे चार महिने थोडेतरी ठीक जातील, उपासमार होणार नाही, असे त्यांना वाटले. त्यासाठी त्यांनी अंगतोड मेहनत करून, मजुरी केली. काम संपल्यानंतर ते कंत्राटदाराकडे गेले तर तो म्हणाला, “आमच्याकडे बिलच आले नाही, तर तुझी मजुरी कुठून द्यायची? आली की देतो, पावसाळ्यानंतर मिळेल.” हे ऐकून त्यांना ब्रह्मांड आठवले. घरी परतण्यासाठी महादू यांच्याकडे पैसे तर नव्हतेच. शेवटी न जाणे किती तास चालत ते पाड्यावर आले.
तो क्षण त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाचा ठरला.
त्यांनी ठरवले आपण किती काळ अशी बेभरवशाची मजुरी करायची? मजुरीसाठी भ्रमंती करताना, त्यांनी गावोगावची शेती पाहिली होती. ही शेती फक्त पावसावर अवलंबून नव्हती, तर लोकांनी पाणी अडवून शेती केली होती. महादू यांनी त्यांच्या शेतातही हाच प्रयोग केला. तसेच, ‘प्रगती प्रतिष्ठान’, ‘बायप फाऊंडेशन’सारख्या स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेतले. पारंपरिक पद्धतीच्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली. न जाणे किती पिढ्या या शेतीमध्ये भात, वरी आणि नाचणी पिकायची. आता महादू मोगरा, सोनचाफा, आंबा, काजू पिकवू लागले. पिकवले तर खरं पण विकत कोण घेणार? यावर ‘प्रगती प्रतिष्ठान’चे तुम्ही पिकवलेला भाजीपाला, फूलफळ विकता, त्यात कसली लाज? कष्ट केलेत त्याचे फळ आहे, हे वाक्य ऐकून महादू स्वतः फुलाफळांनी भरलेली टोपली घेऊन, गावात विक्री करू लागले.
सुरुवातीला समाजबांधव म्हणाले, ‘लाज वाटते की नाही’ मात्र, महादू यांचा व्यवसायात जम बसला. घरात चारपैसे आले, परिस्थिती खूपच पालटली. हे पाहून गावातले इतर लोकही महादू यांच्याकडे सल्ला घेऊ लागले. शेकडो लोक शेतीला व्यवसाय मानून, कष्ट करू लागले. तसेच, अंधश्रद्धा किंवा धर्मांतरण याविरोधातही महादू यांनी स्पष्ट मत मांडून, लोकांना त्याविरोधात प्रवृत्त केले आणि आजही करत आहेत. महादू यांच्या शेतीकामामध्ये त्यांची पत्नी सोनी यांचेही योगदान मोलाचे असेच. महादू म्हणतात की, “अज्ञान आणि अंधश्रद्धा या समस्या गरिबीतूनच उत्पन्न झाल्या आहेत. व्यवसायातून समाजाला स्वावलंबी करायचे आहे. त्यातूनच सामाजिक विकास होऊ शकेल.” प्रतिकूलतेच्या अंधारातून प्रगतीचा सूर्योदय करणारे महादू भोये यांचे विचारकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे शुभेच्छा!