ट्रम्प यांना ‘दादागिरी’ न जमल्याने शुभेच्छेची खेळी!

07 Oct 2025 12:05:37

सत्तेची सूत्रे स्वीकारल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध मार्गांनी जगातील अनेक देश अमेरिकेचे वर्चस्व कसे मान्य करतील हेच पाहिले. यासाठी दबावतंत्राचा वापर त्यांनी केला, भारताविरोधातही त्यांनी हे शस्त्र वापरले. मात्र, भारतीय नेतृत्वाने ‘राष्ट्रहितसर्वोपरि’ म्हणजे काय याची ओळख ट्रम्प यांना करून दिली. त्यामुळेच दबावतंत्राऐवजी शुभेच्छांचा मार्ग ट्रम्प यांनी स्वीकारलेला दिसतो...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगाचा मक्ता आपणच घेतला आहे, अशा थाटात विविध निर्णय घेताना दिसत आहेत. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही त्यांची इच्छा असली, तरी ती पूर्ण करण्यासाठी विविध देशांची कोंडी करण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले आहेत. ‘आम्ही सांगू तसेच वागा, नाही तर तुमच्यावर आयातशुल्काचा बडगा उगारू आणि तुम्हाला चांगलीअच् अद्दलही घडवू,’ असे वर्तन त्यांच्याकडून घडत आहे. त्यातूनच त्यांनी भारतावर जबरदस्त आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला. जो भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्या आपल्या भारतावर तोंडसुख घेण्यासही ट्रम्प यांनी मागेपुढे पाहिले नाही! पण, ट्रम्प म्हणतील ते ऐकायला भारत हा देश काही त्यांच्या ताटाखालचे मांजर नाही.

भारत ‘सार्वभौम राष्ट्र’ असून भारत कोणाच्याच तालावर नाचणारा देश नाही, अगदी अमेरिकेच्याही. हेच ट्रम्प शासनाने भारतासंदर्भात जी भूमिका घेतली आहे, त्यानंतर भारताने दाखवून दिले. सिंगापूरचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज एव यांनी ट्रम्प यांचे पितळ उघडे पडले आहे. “ट्रम्प यांनी भारतासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर भारतावर आपण दादागिरी करू शकत नाही, असा साक्षात्कार ट्रम्प यांना झाला आणि ते त्यांच्या वेळीच लक्षात आल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देऊन ट्रम्प यांनी एकप्रकारे सलोख्यासाठी हात पुढे केला,” असे सिंगापूरचे माजी परराष्ट्रमंत्री एव यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारताविरुद्ध जबर आयातशुल्क लादल्यानंतर, भारताने अन्य प्रमुख देशांसमवेत बोलणी केली. त्यास प्रतिसादही चांगला मिळाला.

विविध प्रकारचे आयातशुल्क लादल्यानंतर भारत बधेल, असे ट्रम्प यांना वाटले असावे. पण, भारत काही बधला नाही. त्यामुळेच मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून ट्रम्प यांनी सलोख्यासाठी हात पुढे केला, असे सिंगापूरच्या या नेत्याचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेलाची आयात करीत असल्याबद्दल भारतावर जबर आयातशुल्क लादले. असे केल्याने आणि भारतावर आर्थिक दबाव आणल्याने, एकप्रकारे रशियावर दबाव येईल आणि तसे झाल्यास रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्याच्या दिशेने रशियाकडून पावले टाकली जातील, असे ट्रम्प यांना वाटले असावे. पण, तसे काहीच घडले नाही. अमेरिकेपुढे झुकण्यास सार्वभौम भारताने ठाम नकार दिला. त्याचप्रमाणे ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात ट्रम्प यांनी पाकिस्तानची तळी उचलून घेण्याची जी भूमिका घेतली होती, त्यावरही जॉर्ज एव यांनी टीका केली. भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकला नाही. ‘राष्ट्र प्रथम’ असा विचार पुढे ठेऊनच वाटचाल करणारे भारताचे नेतृत्व, कोणत्याही बलाढ्य शक्तीपुढे झुकणे अशक्य असल्याचे यानिमित्ताने सर्वांच्या लक्षात आले!


कटक : विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

ओडिशामधील कटक शहरामध्ये दुर्गा विसर्जन मिरवणूक निघाली असताना, या मिरवणुकीवर शहरातील दर्गा बझार भागात या मिरवणुकीवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत १६ लोक जखमी झाले. या घटनेचे वृत्त कळताच शहरात तणाव वाढल्याने, पोलिसांनी तातडीने संचारबंदी जारी केली. तसेच, इंटरनेट सेवाही बंद केली. या घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कटक शहर हे हजार वर्षे जुने शहर असून, येथे बंधुभाव जोपासला जात आहे. पण, अलीकडील काळात काही समाजकंटक या शहराची शांतता भंग करण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण, कायदा व्यवस्था हाती घेऊन शांतता बिघडविणार्‍या या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री मांझी यांनी दिला आहे. ‘विश्व हिंदू परिषदे’ने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला असून, सोमवारी शहर बंदचे आयोजन केले होते. जिहादी शक्तींनी मिरवणुकीवर दगड आणि शस्त्रानिशी हल्ला केला, असा आरोप ‘विश्व हिंदू परिषदे’चे नेते बासुदेव बेहरा यांनी केला आहे.

मिरवणुकीवर झालेला हल्ला म्हणजे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचा आरोपही बेहरा यांनी केला. तलवारी आणि काठ्या घेऊन आलेल्या गुंडांना अटक करण्याऐवजी, पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही ‘विश्व हिंदू परिषदे’ने केला . काँग्रेसच्या स्थानिक आमदाराच्या राजकीय आश्रयामुळे ही गुंडगिरी वाढली आहे. काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांच्या आशीर्वादामुळे या भागात पाकिस्तानी झेंडे फडकताना दिसत आहेत; तसेच ‘आय लव्ह मोहम्मद’ यासारख्या घोषणा दिल्या जात आहेत, असा आरोप ‘विश्व हिंदू परिषदे’ने केला आहे. कटक आणि देशाच्या अन्य भागांत जिहादी शक्ती डोकेवर काढून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे या घटनेवरून दिसून येत आहे. संपूर्ण समाज संघटित आणि सशक्त होणे, हाच अशा घटना रोखण्यावर रामबाण उपाय आहे!


श्रीनगरमध्ये ३३ वर्षांनंतर रावणदहन!

काश्मीर खोर्‍यातून १९९० सालच्या सुमारास, तेथील हिंदू समाजास त्यांच्या मायभूमीतून पळवून लावण्यात आले होते. त्या काळात काश्मिरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. त्या घटनेस ३३ वर्षे उलटून गेली. आता तेथील परिस्थितीत बदल होत असल्याचे दिसून येत आहे. अधूनमधून त्या केंद्रशासित प्रदेशात देशविरोधी शक्ती डोके वर काढत असल्या, तरी तेथील परिस्थितीत खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. ३३ वर्षांच्या नंतर प्रथमच श्रीनगर शहरातील शेर-इ-काश्मीर स्टेडियमवर, विजयादशमीच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम योजण्यात आला होता. या कार्यक्रमास हिंदू समाजासह अन्य धर्मीयही उपस्थित होते. प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत, फटाके उडवीत रावणदहन करण्यात आले. दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींनी मिळविलेला दिवस म्हणजे विजयादशमी.

हा उत्सव साजरा करण्यासाठी ३३ वर्षांनंतर प्रथमच हिंदू आणि अन्य समाजबांधव स्टेडियमवर उपस्थित होते. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या भव्य प्रतिमांचे दहन होत असताना,उपस्थित जनसमुदायाने प्रभू रामचंद्राचा एकच जयघोष केला. परंपरागत वाद्यांच्या घोषात, फटाके उडवून आणि मिठाई वाटून, श्रीनगरमध्ये विजयादशमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुस्लीम समाजाचे नागरिकही सहभागी झाले होते. त्यात पीपल्स द डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते इल्तीजा मुफ्ती यांचा समावेश होता. ‘काश्मिरी हिंदू संघर्ष समिती’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमापूर्वी इंदिरा नगरमधील मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. गेल्या ३३ वर्षांनंतर प्रथमच अशी शोभायात्रा श्रीनगरमध्ये काढण्यात आली होती. काश्मीरमधील वातावरण बदलत चालले आहे, याची प्रचिती या रावणदहन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वाना आली!

पुरी, कोणार्क भागात धर्मांतरण!

ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरी आणि कोणार्क भागात, हिंदू समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. ती तक्रार लक्षात घेऊन, आयोगाने पुरीचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजाविली आहे. पुरीच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचे कारस्थान रचले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर, आयोगाने कृती अहवाल मागविला आहे. आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये, ख्रिस्ती धर्मप्रसारक जोशुआ पट्टाभी आणि टी. डेव्हिड यांची नावे पुढे आली असून, त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली धर्मांतराचे कार्य चालते असा आरोप करण्यात आला आहे. गरीब तेलुगू आणि ओडिशा मच्छिमार कुटुंबांना आमिषे दाखवून, त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आहे.

वर ज्या धर्मप्रसारकांचा उल्लेख करण्यात आला आहे, ते दोघेही आंध्र प्रदेशातील आहेत. रात्री उशिरा मेळावे घेऊन, या दोघांकडून धर्मांतराचे काम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. महिला आणि मुलांना बाटविले की संपूर्ण कुटुंब बाटेल, असे धर्मप्रसारक पट्टाभी जाहीरपणे सांगत असतो. मानसिक दबाव, जादूटोणा, आर्थिक आमिषे याद्वारे धर्मांतर करण्याचे उद्योग हे धर्मप्रसारक करीत आहेत. या धर्मप्रसारकांना विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याचा आरोपही केला जात आहे. धर्मांतर करून ओडिशामधील लोकसंख्येचा समतोल बिघडविण्याचे कार्य, या धर्मप्रसारकांकडून केले जात आहे. या धर्म प्रसारकाकडून कोणत्या कायद्यांचे उल्लंघन होत आहे, त्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश मानवी अधिकार आयोगाने संबंधित शासकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. ओडिशा राज्यातील लोकसंख्येचा समतोल बिघडविण्याचे कारस्थान ख्रिस्ती धर्मप्रसारक किती मोठ्या प्रमाणात करीत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी!



Powered By Sangraha 9.0