२०१४ साली देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि एका नव्या युगाला सुरुवात झाली. या युगात वरपासून खालपर्यंतच्या व्यक्तीचा विकास कसा साधला जाईल, या ध्यासाने ते दिवसातले १८ तास काम करत आहेत. परिणामी आज ‘आत्मनिर्भर विकसित भारता’कडे आपण दमदार पावले टाकत असून, २०४७ सालापर्यंत हा भारत सर्वच क्षेत्रांत मोठी महाशक्ती म्हणून उदयास येईल. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे भारताने तंत्रज्ञानात मोठी भरारी घेतली असून, रोजच काहीतरी नवीन शोध लावले जात आहेत. या शोधांचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जगण्यावर सकारात्मक रितीने पडत असून, त्यांचे जीवन अधिक सुखकर होत आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनतेच्या समस्या थेट आपल्यापर्यंत पोहोचतील, यासाठी खास व्यवस्था करत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते दररोज सर्वसामान्यांशी २४ तास जोडले जाणार आहेत.
नागरिकांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत आणि समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी मंत्री झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘क्यूआर कोड संवाद माध्यम’ या उपक्रमाची दिंडोरीत सुरुवात करण्यात आली.
या माध्यमातून नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. युवा नेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून, या उपक्रमाला मूर्त रूप देण्यात आले. नागरिकांना विविध विषयांवरील प्रश्न, सूचना, समस्या अथवा विभागनिहाय अडचणी क्यूआर कोड स्कॅन करून मांडता येणार आहेत. त्यानंतर ही माहिती थेट मंत्री झिरवाळ यांच्या मोबाईलवर पोहोचणार असून, ते स्वतः त्याचा पाठपुरावा करतील. याचे उद्घाटन करताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, “राज्याचा कारभार बघताना मतदारसंघातील जनतेशी सततचा संवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी थेट आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे संवाद माध्यम सुरू केले आहे.” हा क्यूआर कोड तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आला आहे. हा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी शासन दरबारी पोहोचण्याचा एक नवा प्रभावी मार्ग ठरणार आहे. तसेच, जनतेच्या समस्या आता थेट मंत्र्यांच्या मोबाईलवर पोहोचणार आहेत.
सर तुम्हीसुद्धा?
एकीकडे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवून, त्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे झिरवाळांचा विधानसभा मतदारसंघ ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतो, त्याचे खासदार मात्र स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरदचंद्र पवार गटाच्या या खासदार महोदयांनी सवयीप्रमाणे आगळावेगळा प्रताप करत, यंत्रणेला फसवण्याचा प्रयत्न केला. चक्क राज्य सरकारचा बनावट जीआर पाठवत, अधिकार्यांच्या नावाखाली निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. आता याप्रकरणी खासदार महोदयांची चौकशी केली जाईल, अशी हमी राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी दिली. लोकसभेच्या पवित्र मंदिरात पहिल्यांदाच पोहोचलेले खासदार भगरे, आपल्या पराक्रमामुळे चांगलेच वादात अडकण्याची चिन्हे आहेत. खासदार भास्कर भगरे यांनी अधिकार्यांच्या संगनमताने सार्वजनिक प्रकल्पांच्या नावाखाली, निधीचा अपहार करण्यासाठी थेट राज्य शासनाचा अध्यादेशच बनावट तारखेचा पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नाशिकमधील पर्यटनस्थळी सुविधा पुरवण्यासंदर्भात हे ई-टेंडर होते. याप्रकरणी नाशिकमधील भद्रकाली पोलिसांनी दि. १८ जून रोजी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. लागलीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दि. ३१ जुलै रोजीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर नलावडे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज करून, या प्रकरणामागे खासदार भगरेच असल्याचा दावा केला. या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा केला गेल्याचा आरोपही त्यांनी भगरेंवर केला. त्यानंतर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी प्राथमिक सुनावणीअंती नलावडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले खरे. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत याप्रकरणी खासदार महोदयांची चौकशी करणार का? अशी विचारणाही केली. यावर पोलिसांकडूनच खासदारांचीही चौकशी होईल, अशी हमी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी दिली. दुसरीकडे सदर प्रकरण हे न्यायालयात आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित होणार नसून आपला काहीही संबंध नसल्याची मखलाशी खासदार भगरे यांच्याकडून कितीही केली जात असली, तरी पाणी नक्कीच कुठेतरी मुरत आहे.
विराम गांगुर्डे