आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव हा माणसाचा मित्र झाला आहे. कोणत्याही क्षणी हा त्याची साथ सोडत नाही. मात्र, जरी हा मित्रासारखा सतत सोबत असला, तरी त्याची संगत माणसाला विषारी फळेच चाखायला देते. त्यामुळे त्याची संगत टाळलेलीच बरी. ताणतणावामुळे मानवी आयुष्यात निर्माण होणार्या समस्यांचा घेतलेला आढावा...
ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो. त्यात आपण निर्णय कसे घेतो हेही आलेच. दबावाखाली घेतलेले निर्णय अनेकदा गोंधळात टाकणारे ठरतात. काही वेळा आपण तार्किक विचारासाठी वेळ न मिळाल्याने, भावनेच्या भरामध्ये आवेशात येऊन चुकीचे निर्णय घेतो. क्षणिक निर्णय असोत, साधे दैनंदिन निर्णय असोत किंवा गुंतागुंतीचे निर्णय असोत; ताण अनेक प्रकारे निर्णय घेण्यावर परिणाम करतो. आपल्या विचारशक्तीला धूसर करतो, आत्मविश्वास कमी करतो आणि निर्णय क्षमतेवर सावली टाकतो.
नवीन निर्णय घेण्याच्या आणि बदलाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवरही ताणतणावााचा परिणाम होतो.
ताण आपल्या विचारशक्तीला मर्यादा घालतो. त्यामुळे नवे पर्याय पाहण्याची आपली क्षमताच मंदावते. उदाहरणार्थ, २०१२ सालच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, वैद्यकीय निवड परीक्षेची तयारी करण्याच्या ताणाला सामोरे गेलेले विद्यार्थी ‘सवयीवर आधारित’ निर्णय घेत असत. कारण, मेंदूला तसा विचार करणे सोपे पडते. याउलट, ताण नसलेल्या व्यक्ती परिस्थितीनुसार नवीन निर्णय घेण्यास सक्षम असतात. संशोधकांच्या मते, ताणामुळे मेंदू सवयीने निर्णय घेण्यावर अवलंबून राहतो. कारण, त्यासाठी संज्ञानात्मक ऊर्जा कमी लागते.
दीर्घकालीन ताण मेंदूच्या रसायनशास्त्रात बदल करतो आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेला कमकुवत करतो
प्रारंभीचा सौम्य ताण कधी कधी लाभदायीही असतो. तो मेंदूमध्ये रक्तप्रवाह आणि प्राणवायूचे प्रमाण वाढवून जागरूकता निर्माण करतो. पण, जेव्हा चिंता दीर्घकाल अनियंत्रित होते, तेव्हा निर्माण होणारा ताण घातकच ठरतो. त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह आणि प्राणवायूचे प्रमाण घटते. तसेच या स्थितीत मेंदू गोंधळलेल्या स्थितीत जातो आणि अशा अवस्थेत मेंदूला, तार्किक निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळत नाही. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दैनंदिन निर्णय घेणेही कठीण होते
तणावाचा प्रभाव इतका सूक्ष्म असतो की, तो आपल्या दैनंदिन जीवनालाही व्यापतो. कोरोनाच्या काळात हॅरिस पोलच्या एका सर्वेक्षणात असे आढळले की, अनेक अमेरिकन प्रौढांना भविष्यासंबंधी कमी, पण दैनंदिन निर्णयांबद्दल अधिक ताण जाणवत होता.
एक तृतीयांश लोकांनी कबूल केले की, साथीच्या काळात आज काय घालायचे किंवा काय खायचे, अशा साध्या गोष्टी ठरवणेही त्यांना अवघड वाटत होते. ही केवळ अनिश्चिततेची नव्हे, तर ताणाने विचारशक्ती कशी गोंधळते याची जाणीव देणारी वस्तुस्थिती आहे.
सातत्याने निर्णय घेण्याच्या स्थितीमुळेही ताण आणि थकवा येऊ शकतो, ताण निर्णयक्षमतेवर परिणाम करतोच; पण त्याचवेळी सतत निर्णय घेणेही ताण वाढवते. मानसशास्त्रात याला ‘निर्णय घेण्याचा थकवा’ (डिसिझन फटिग) म्हणतात.आपण एका दिवसात जेवढे जास्त निर्णय घेतो, तेवढे पुढील निर्णय घेणे कठीण होत जाते. अधिक कार्यरत झाल्यास मेंदूचा ऊर्जासाठा मर्यादित असल्याने, त्याची ऊर्जा कमी होते आणि तो थकतो. थकवा हा ताणाचा नैसर्गिक परिणाम आहे.
एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि मानसिक अस्थैर्य ही ताणाच्या छायेत वाढणारी लक्षणे आहेत. यामुळे निर्णय अस्पष्ट व अनिश्चित होतात. विशेषतः अनेक जबाबदार्या सांभाळणारे लोक या वैचारिक थकव्याचा अनुभव घेतात.
निर्णय घेणे ही आपल्या दैनंदिन जीवनातील सततची प्रक्रिया आहे. वैयक्तिक नाती असोत वा व्यावसायिक निवडी, आपण घेतलेले निर्णय आपल्या ताणाच्या पातळीवर थेट परिणाम करतातच. ताण ही शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. तो आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सज्ज करतो. भीती, चिंता किंवा असुरक्षिततेच्या भावनांमुळे आपल्या ग्रहणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या निर्णयक्षमतेत पूर्वग्रह निर्माण होतात आणि आपण तर्कशुद्धतेपेक्षा भावनांवर आधारित निर्णय घेतो.
आपल्या भावनांची अवस्था आणि निर्णय घेण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध नाजूक आणि गुंतागुंतीचा असतो. संशोधनानुसार, ताणाखाली असलेले लोक पर्यायांचा नीट विचार करण्याऐवजी, जलद आणि आवेगात निर्णय घेण्याची प्रवृत्ती दाखवतात. या घाईगडबडीत अनेकदा चुकीचे पर्याय निवडले जातात आणि त्याचे परिणाम दूरगामी ठरतात. प्रक्रियेचे स्वरूप समजून घेत विचारपूर्वक, शांत मनाने आणि माहितीपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय अनिश्चितता आणि भावनिक तणाव कमी करू शकतो. ताण फक्त निर्णयक्षमता कमी करत नाही, तर जोखीम आणि धोक्यांची संभाव्यतादेखील वाढवतो. जेव्हा मनावर दबाव वाढतो, तेव्हा व्यक्ती अप्रिय परिस्थितीतून लवकर सुटका मिळवण्यासाठी घाईघाईने, कधी कधी धोकादायक निर्णय घेतात. त्यामुळेच ताण आणि निर्णय यांच्यातील नाते इतके गुंतागुंतीचे आहे.
जितका ताण अधिक, तितका परिपक्व विचार कमी.
या सर्व प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक असतो ‘मेटाकॉग्निशन’. म्हणजेच, आपल्या विचारप्रक्रियेवर चिंतन करण्याची क्षमता. ताण वाढला की, ही क्षमता मंदावते आणि आपण आपल्या निर्णयांचे मूल्यांकन करणे थांबवतो. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्या चुका करतो, ज्यामुळे ताण अधिक वाढतो. म्हणूनच, ताण आणि निर्णय यांचे संतुलन राखण्यासाठी विचारपूर्वक कृती करणे, ही एक आवश्यक कला आहे. निर्णय घेण्याआधी थोडा विराम घेणे, परिस्थितीचे निरपेक्ष विश्लेषण करणे किंवा विश्वासू व्यक्तींशी सल्लामसलत करणे या सवयी ताणाचा भार कमी करू शकतात.
जेव्हा आपण आपला ताण कमी करण्यासाठी जागरूक प्रयत्न करतो, तेव्हा निर्णय केवळ योग्य ठरतात असेच नाही, तर त्यातून मनःशांती, आत्मविश्वास आणि स्पष्टता या त्रिसूत्रीचाही उदय होतो.
परिस्थिती कधीच आपल्याला परिभाषित करत नाहीत; आपण घेतलेले निर्णयच आपली ओळख घडवतात. स्टीफन कोव्ही ‘द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आपल्याला स्मरण करून देतात की, जीवन आपल्या परिस्थितींनी नव्हे, तर आपण घेतलेल्या निर्णयांनी घडते. मी माझ्या परिस्थितीतून घडलो नाही, तर माझ्या निर्णयांतून घडलो आहे.
डॉ. शुभांगी पारकर