कल्याण : नगराध्यक्षा पदासाठी पार पडलेल्या आरक्षणात अंबरनाथ नगरपरिषदेसाठी खुला महिला प्रवर्ग पडला आहे. खुल्या प्रवर्गामुळे इच्छुकांची भाऊगर्दी होणार असली तरी पायल कबरे यांचं नाव वरचढ आहे. त्यामुळे कबरे यांच्या रुपाने अंबरनाथच्या राजकारणात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पायल या दिवंगत नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे यांच्या कन्या आहेत.
पायल या उच्चशिक्षित असून त्यांनी एम. ए .,एल .एल .बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या आठ वर्षांपासून भाजपाच्या राज्यस्तरीय राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी अनेक संघटनात्मक भूमिका पार पाडल्या आहेत. त्या तीन वेळा भाजपच्या राज्य समितीवर राहिल्या आहेत. भाजप युवा मोर्चा, भाजप विद्यार्थी विभागाच्या राज्य सह संयोजक या नात्याने त्यांनी काम केले आहे. सध्या त्या ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी आहेत. त्यांनी आपल्या कामातून अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मागील दोन वर्षांत ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सेलच्या कामाच्या वाढीसाठी त्यांच्या कामाची दखल राज्यस्तरीय नेत्यांनी घेतली आहे. त्यांच्या २४ दिवसीय विदर्भ दौऱ्याने आणि १५ दिवसीय कोकण दौऱ्याने त्यांनी या सेलमध्ये दमदार कामगिरी करून कमी वयात मोठा पल्ला गाठला आहे.
त्याचबरोबर अंबरनाथमध्ये त्यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय कारसेवक गौरव हा कार्यक्रम आणि त्यांच्या फाउंडेशनतर्फे करण्यात आलेला भव्य महिला सन्मान ह्याची दखल घेण्यात आली आहे.
दिवंगत पूर्णिमा कबरे यांचे काम आणि निष्ठा संपूर्ण अंबरनाथला ज्ञात आहे. त्यामुळे मूळ भाजप परिवारातील पायल यांनी स्वतःची अशी वेगळी आणि ठसठशीत ओळख पक्षात निर्माण केली आहे. पायल यांना मिळालेले राजकीय वलय आणि त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलेला ठसा यामुळे नगराध्यक्ष पदांसाठी उच्च शिक्षित नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता शहरातून व्यक्त केली जात आहे.