ही तर संघ कार्याची शताब्दी : वैभवराग रिसबूड

06 Oct 2025 20:20:44

डोंबिवली : यंदाचे वर्ष हे संघ शताब्दीचे नसून, संघ कार्याची शताब्दी आहे. संघाचे काम हे व्यक्तिनिर्माणाचे आहे. व्यक्तिनिर्माणातून समाज परिवर्तन आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती असे अविरत काम मागील १०० वर्षांपासून चालू आहे, असे मत कल्याण जिल्ह्याचे सहाव्यवस्थाप्रमुख वैभवराग रिसबूड यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षाची सुरुवात डोंबिवली पूर्वेतील समर्थ नगरात भव्य विजयादशमीचे औचित्य साधून रविवारी केली. यावेळी रिसबूड बोलत होते. हिंदू समाजात विजयादशमीचे शाश्वत महत्त्व राहिले आहे, कारण ही शक्ती व पराक्रमाच्या जागृतीचे प्रतीक मानली जाते. विजयादशमी उत्सव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेचा अविभाज्य भाग राहिला असून, अनुशासन, एकता आणि सांस्कृतिक गौरव याचे प्रतीक आहे. यंदा शताब्दी वर्षाच्या प्रारंभासोबत हा उत्सव स्वयंसेवक व संपूर्ण हिंदू समाजासाठी विशेष महत्त्वाचा ठरला.

रिसबूड यांनी सांगितले, समर्थ रामदासांनी मोघलांच्या काळात गावोगावी जाऊन हिंद रक्षणासाठी शक्तीकेंद्र तयार केली तसेच १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेला संघ मागील १०० वर्षांपासून शांतपणे न बोलता काम करत आहे. १०० वर्षांचा संघाच्या प्रवासात संघाने टीका सोसली, अनेक प्रकारचा संघर्ष केला आणि अनुकलतेची अनुभूती घेत आहे. आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो आणि याच संकल्पनेतून संघाच्या मार्फत दीड लाख सेवा कार्ये चालू आहेत, जी राष्ट्रनिर्मितीचे काम करत आहेत. आज देशात तातडीने करण्यासारखी पंच परिवर्तनाचे कार्य आहे. परिवर्तन म्हणजे काय याचा अर्थ वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावताना समरसता, पर्यावरण, नागरिक शिष्टाचार, स्व चा बोध आणि कुटूंब प्रबोधन या ५ विषयांचा आशय सांगीतला. संपूर्ण समाजाने या पंचपरिवर्तन विषयात सक्रीयतेने सहभागी व्हावे." असे आवाहन ही त्यांनी केले.

उत्सवाची माहिती देताना समर्थ नगर कार्यवाह डॉ. प्रशांत नाईक म्हणाले, “समर्थ नगर, डोंबिवली पूर्वेतील ६ नगरातील १ नगर आहे. उत्सवाच्या निमंत्रणात व आयोजनात आम्हाला सज्जनशक्तीकडून प्रचंड उत्साह व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा उत्साह फक्त विजयादशमी उत्सवापुरता मर्यादित राहिला नाही, तर संघ शताब्दी वर्षाबाबत देखील व्यापक स्वरूपात दिसून आला.”

प्रत्येक विजयादशमी उत्सवाप्रमाणे यंदाही शस्त्रपूजन, मुख्य उद्बोधन तसेच विशिष्ट अतिथींची भाषणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते तसेच समाजातील सज्जनशक्तीने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी शैलेश रेगे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0