पालघर जिल्ह्यात मोखाडा म्हणून एक भाग आहे. या मोखाड्याच्या दऱ्याखोऱ्यात, निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत एक झोपडी होती. ही झोपडी दिसायला साधीसुधी वाटत असली तरी, तिथे वास्तव्याला होते एक महापुरुष; नवसू महादू वळवी. आयुष्यभर निसर्गाशी एकरूप होऊन जगणारे, वनौषधींचे सखोल अभ्यासक आदिवासी समाजाचा खरा मित्र आणि सर्वार्थाने ऋषितुल्य असे हे व्यक्तिमत्त्वं.
तरुण वयात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाच्या शाखेत रुजलेले नवसू दादा विचारांनी तितकेच शिस्तबद्ध होते. व्यसनाधीनतेच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासी बांधवांसाठी त्यांनी ठामपणे व्यसनमुक्तीची मोहीम उभारली. त्यांनी सुरु केलेल्या 'एक गाव – एक गणपती' या उपक्रमातून त्यांनी गावोगावी एकात्मतेची गाथा रचली. अंधश्रद्धेच्या जोखडातून माणूस बाहेर पडावा यासाठी ते झिजले. त्यांच्या या अथक कार्यासाठी त्यांना डॉ. हेडगेवार पुरस्कार ही प्रदान करण्यात आला आहे.
नवसू दादांचे नाव घेतले की आठवते जंगल, झाडं, वनस्पती आणि वनौषधींचं अद्भुत जग. त्यांनी अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला, पण पर्यटनासाठी नव्हे; तर औषधींच्या शोधासाठी. कोणती पाने ताप उतरवतात? कोणत्या वनस्पतींची मूळे शरीर बळकट करतात? कोणती फुले आयुष्याचे सौंदर्य वाढवतात? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना “वनस्पतीशास्त्राचं चालतं-बोलतं विद्यापीठ” म्हटले जाऊ लागले.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून अनेक डॉक्टर्स, संशोधक, विद्यार्थी मोखाड्यातील त्यांच्या झोपडीपर्यंत धाव घेत. नवसूदादांनी स्वतः वनौषधींच्या काढ्याने कित्येक रुग्णांना जीवनदान दिल्याची माहिती आहे. या कार्यासाठी त्यांना दधिची पुरस्कार आणि वनबंधू पुरस्कार देखील मिळाले आहेत. फक्त उपचारच नव्हे, तर आदिवासी परंपरेचं जतन हेही त्यांचं ध्येय होतं. त्यांनी “ठाणे जिल्हा आदिवासी व औषधी उपचार संघ” स्थापन करून वैद्यांना एकत्र आणलं, प्रशिक्षण दिलं.
गुजरात, दादरा-नगर हवेली पर्यंतच्या देवळांचा त्यांनी अभ्यास केला. आदिवासींच्या श्रद्धा, परंपरा, देवदेवता यांचं ज्ञान त्यांनी जतन करून ठेवलं. दादांच्या शब्दांत — “औषधं शरीर वाचवतात, पण परंपरा आत्मा जिवंत ठेवतात.” नवसूदादा वळवी यांचं आयुष्य आलिशान घरात नव्हे, तर एका साध्या झोपडीत गेलं. गावकऱ्यांनी त्यांना घर बांधून देऊ केलं, पण त्यांनी नाकारलं. त्यांना निसर्गाची झोपडीच प्रिय होती. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांततेचं तेज, वाणीमध्ये पटवून देणारी ताकद आणि जीवनात अपार साधेपणा. खरंतर त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जणू एखाद्या ऋषीचीच आठवण येईल असे होते. त्यांची पत्नी गृहिणी होती. त्यांचा देखील भरभक्कम पाठींबा नवसुदादांना होता. जगनदादा हिलीम हे नवसुदादांचे मानसपुत्र. आज ते दखील समाजकार्यात सक्रीयतेने नवसुदादांच्या पावलावर पाऊल ठेऊन कार्य करतायत.
जुलै २०२५ दरम्यान वयाच्या ८६ व्या वर्षी नवसूदादा वळवी यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मोखाडा तालुका, पालघर जिल्हा, तसेच आदिवासी समाज जणू अंधारात बुडाला. पण या अंधारातही त्यांच्या जीवनाची ज्योत प्रेरणेचे प्रकाशपुंज पसरवत राहणार आहे. नवसुदादांच्या निधनानंतर मोखाडा येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते. तेव्हा भैय्याजी म्हणाले होते की, “नवसुदादा हे स्वतःसाठी जगलेच नाहीत. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलं. आदिवासी बांधवांना ‘आम्ही हिंदू आहोत’ हे ठामपणे सांगण्याची ताकद नवसुदादांनी दिली होती.” संपूर्ण परिसरातील कार्यकर्ते, संशोधक, ग्रामस्थ या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते. नवसू महादू वळवी यांचं आयुष्य हे फक्त एक जीवनकथा नाही, तर समाजासाठी एक संदेश आहे. “ज्ञान मिळवा, ते वाटा, पण स्वतः मात्र साधेपणाने जगा.”