सेवाभावी प्रकल्पांचा अभ्यास महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा: विजय पुराणिक बस्ती परिवर्तन योजनेचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा

06 Oct 2025 20:08:13

मुंबई : सेवाभावी प्रकल्पांचा अभ्यास महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. असे प्रतिपादन बस्ती परिवर्तन योजनाचा चतुर्थ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाध्ये विजय पुराणिक (संयुक्त महामंत्री, राष्ट्रीय सेवा भारती) यांनी केले. ५ ऑक्टोबर रोजी बी. एन. वैद्य सभागृह दादर येथे बस्ती परिवर्तन योजनाचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तेव्हा प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सेवा कार्य निष्ठा, स्पष्ट उद्दिष्ट आणि समाज परिवर्तनाच्या भावनेने केले पाहिजे. तेव्हाच समाजात खरी प्रगती आणि सकारात्मक बदल घडू शकतात. या कार्यक्रमाला सुमारे ५०० लोक उपस्थित होते. या प्रसंगी कुमार प्रोसेस कन्सल्टंट्स अँड केमिकल्स प्रा. लि. (कुमार फिल्टर्स)चे संस्थापक व ख्यातनाम उद्योजक सुधीरजी पिसाट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रभावी प्रदर्शनी, चार वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे दर्शन घडविणारी लघु चित्रफीत, गुणवंत कार्यकर्त्यांचा सन्मान, तसेच सुदृढ बालक जागरूक माता या स्पर्धात्मक अभियानातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन प्रकल्पातील कार्यकर्त्या ताईंनी अत्यंत प्रभावीपणे केले, ही या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली. सेवा भारती कोकण प्रांताच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून मुंबईतील ५३ वस्त्यांमध्ये माता-बाल आरोग्य आहार प्रकल्प, किशोरी विकास, बाल संस्कार, वाचनालय सेवा तसेच रुग्णोपयोगी साहित्य सेवा असे एकूण ९८ सेवा प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. सुमारे १०० वस्ती कार्यकर्ते आणि ७५ सहयोगी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे वस्त्यांमध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येत आहे.


Powered By Sangraha 9.0