डोंबिवली : "संघाने उत्तम नेतृत्व निर्माण करण्याचे काम अविरतपणे यशस्वीरित्या पार पाडले. आणि हेच भारताच्या उत्कर्षसाठीचे एक महत्वाचे कारण आहे", असे मत विभाग सेवा प्रमुख श्रीरंग रामचंद्र पिंपळीकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षाची सुरुवात डोंबिवली पश्चिमेतील नेताजी सुभाष नगरात भव्य विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून रविवारी केली. यावेळी पिंपळीकर बोलत होते. या प्रसंगी मुख्य अतिथी प्रशांत वसंत देशपांडे आणि श्रीरंग रामचंद्र पिंपळीकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.
पिंपळीकर यांनी सांगितले, मानवीय गुण दूरदर्शी, निस्वार्थी पणा, पालकत्व आणि संभाषण कौशल्य याचे नेतृत्व करण्यासाठी कसे महत्वाचे आहे ते समजावून सांगीतले. तसेच हिंदू समाजात विजयादशमीचे शाश्वत महत्त्व राहिले आहे, कारण ही शक्ती व पराक्रमाच्या जागृतीचे प्रतीक मानली जाते. विजयादशमी उत्सव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेचा अविभाज्य भाग राहिला असून, अनुशासन, एकता आणि सांस्कृतिक गौरव याचे प्रतीक आहे. यंदा शताब्दी वर्षाच्या प्रारंभासोबत हा उत्सव स्वयंसेवक व संपूर्ण हिंदू समाजासाठी विशेष महत्त्वाचा ठरला असे ही त्यांनी सांगितले .
समाजाच्या साक्ष्मीकरणासाठी संघाने पंच परिवर्तन कार्यक्रम राबविला - पिंपळीकर
“ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात डॉ. हेडगेवारांनी एकूण १७ जणांना एकत्र करून त्यांच्या रहात्या घरी केली. डॉ हेडगेवार अभिजात देशभक्ती असलेले व्यक्तिमत्व होते. संघाची सुरुवात करण्याची कारणे आत्मविश्वास हीन समाज, असंघटीत समाज, अनुशासन अभाव असलेला समाज आणि राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव असे होते. त्यावर उपाय म्हणून अद्वीतीय शाखा पद्धती निर्माण केली. १९४० च्या संघ शिक्षा वर्गात भारतातील सर्व राज्यातून स्वयंसेवक उपस्थित होते. संघाचा १०० वर्षाचा प्रवास उपहास, संघर्ष आणि नंतर अनुकूलता असा झाला. संपूर्ण जग शांतीचा मार्ग मिळण्यासाठी आशेने भारताकडे बघत आहेत. असे असताना देखील हिंदुत्वावर आघात होताना दिसतात. अनेक आव्हाने भारतासमोर उभी आहेत. या आघातांना सहन करण्यासाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी पंच परिवर्तन कार्यक्रम संघाने राबवण्याचे ठरवले आहे. समाजातील फूट मिटवण्यासाठी समरसता, परिवारातील असलेल्या समस्यांना सोडवण्यासाठी कुटुंबप्रबोधन, आज पर्यावरण विस्कळीत झालेले दिसते त्याला ताळ्यावर आणण्यासाठी पर्यावरण, आत्मविस्मृतीतून बाहेर येण्यास 'स्व - भाव ' आणि शिस्तप्रीय भारत निर्माण होण्यासाठी नागरिक शिष्टाचार अश्या पाच विषयांवर काम करणे आवश्यक आहे. आपल्या समाजाची क्षमता आहे फक्त एका हाकेची आवश्यकता आहे, हे काम आज संघ करत आहे. संपूर्ण समाजाने या हाकेला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. " असे ही त्यांनी सांगितले.
उत्सवाची माहिती देताना नगर कार्यवाह शैलेंद्र श्रीकांत सज्जे म्हणाले “नेताजी सुभाष नगर, डोंबिवली पश्चिमेतील २ नगरातील १ नगर आहे. उत्सवाच्या निमंत्रणात व आयोजनात आम्हाला सज्जनशक्तीकडून प्रचंड उत्साह व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा उत्साह फक्त विजयादशमी उत्सवापुरता मर्यादित राहिला नाही, तर संघ शताब्दी वर्षाबाबत देखील व्यापक स्वरूपात दिसून आला.”
प्रत्येक विजयादशमी उत्सवाप्रमाणे यंदाही शस्त्रपूजन, मुख्य उद्बोधन तसेच विशिष्ट अतिथींची भाषणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते तसेच समाजातील सज्जनशक्तीने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.