देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; २५ जण जखमी

06 Oct 2025 13:28:09

मुंबई : बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात जगदंबा देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. गावातील काही मंडळांनी आरोपी सापडल्याशिवाय विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु पोलिसांनी संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रविवारी पहाटे ३.३० वाजता मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दसरा झाल्यानंतर गावात विविध मंडळांकडून देवीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशांचा गजरात मिरवणुका सुरू असताना एका गल्लीच्या परिसरात रात्री अचानक विशिष्ट जमावाकडून दगडफेक झाली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला. या हल्ल्यात पंचवीस जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून गावामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. धार्मिक उत्सवात जाणीवपूर्वक अशा घटना घडवून आणल्याने नागरिक व सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0