शक्तीपीठ महामार्ग भाग २: सांगलीतही शक्तीपीठ महामार्गाला विरोध मावळला

06 Oct 2025 20:36:21

सांगली : शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यांमधून जातो. आटपाडी तालुक्यात तो जिल्ह्यात प्रवेश करतो. पुढे, कवठे महांकाळ, तासगाव आणि मिरज तालुक्यातून जातो. साधारण ५९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. यासाठी साधारणतः ५९० हेक्टर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. त्यापैकी अनेक भागात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. या वृत्तमालिकेच्या पहिल्या भागात आपण सोलापूर जिल्ह्यातील संयुक्त मोजणीला आढावा घेतला. यानंतर सांगली जिल्ह्यातील संयुक्त मोजणीची सद्यस्थिती जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधील १०० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. याबाबत माहिती देताना आटपाडीचे उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल म्हणतात, माझ्या कार्यक्षेत्रात शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या १३ जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गची माझ्या कार्यक्षेत्रातील लांबी ३.९६ किलोमीटरची इतकी आहे.

पुढे ते म्हणाले, दि. २६ जून रोजी महामार्गाच्या संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रम होते. यामध्ये काही मोबदल्याबाबतचे संभ्रम होते. या महामार्गाच्या आवश्यकतेबाबत संभ्रम होते. मात्र, सर्व प्रशासकीय विभागांनी विशेषतः महसूल विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांशी वारंवार संवाद साधला आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. यासाठी नागरिक आणि प्रशासन अशा ८ बैठक झाल्या. या बैठकीतून हळूहळू शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. यातूनच पूर्वी विरोध करणारे शेतकरी नंतर मात्र मोजणीसाठी स्वतःहून पुढे येत सहकार्य करू लागले. केवळ ३ दिवसात आम्ही ही संयुक्त मोजणी पूर्ण केली.

आत्तापर्यंत काही गावांत शेतकऱ्यांच्या सकारात्मक मदतीमुळे तीन गावांतील संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झालेले आहे. याभागात शेतकऱ्यांनी प्रशासनाला खूप चांगले सहकार्य केले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला गोव्यामधील, कोल्हापूरमधील आणि बेळगावमधील बाजारपेठांमध्ये ऍक्सेस या महामार्गामुळे मिळणार आहे. याचसोबत, गोवा येथे समुद्रमार्गे व्यापार करण्यासही यातून चालना मिळेल. तसेच, नागपूरशी जोडले गेल्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश यासंपूर्ण भागाशी सांगलीचा व्यापाराच्या दृष्टीने समन्वय होईल. त्यामुळे मी सांगलीतील शेतकऱ्यांना आवाहन करतो की, आपण जी जमीन प्रकल्पात द्याल त्याला जास्तीत जास्त दर देण्यास शासन प्रयत्नशील आहे.
- अशोक काकडे,
जिल्हाधिकारी, सांगली

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महामार्गामुळे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातूनच परिसराचा विकास होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम असणे आवश्यक नाही. शासन आणि प्रशासनाचे शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य आहे. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांमधील सर्व संभ्रम दूर करण्यात यशस्वी झालो. आमच्या गावात संयुक्त मोजणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देणे हीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मोजणी प्रक्रिया चालू आहे तिथेही शेतकऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे.
- डॉ.विक्रम बांदल,
उपविभागीय अधिकारी, विटा, सांगली.



आमच्या संपूर्ण गावाची ६५ हेक्टर जमीन या प्रकल्पात जाते आहे. त्यापैकी आमच्या वडिलांच्या नावे असणारी जमीन ७८ गुंठे जमीन शक्तीपीठ महामार्गात जाते आहे. आमची संयुक्त मोजणी झालेली आहे. साधारण एक महिना झाला. आमच्या गावातील ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी मोजणीला संमती देऊन मोजणी करून घेतली आहे.
- संताजी पाटील
शेतकरी, नागाकवठे, सांगली.

आजतागायत आम्हाला आमच्या शेतात जायला यायला वाट नाही. आज पहिल्यांदा आम्हाला आशा निर्माण झाली आहे की, शेताला जायला आम्हाला वाट मिळणार आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेला आणि प्रकल्पाची वाट आपण अडवू नये, त्यात अडथळा आणू नये. शेतकऱ्यांनी कोणत्याही कामात अडथळा आणू नये. आपल्याला जमिनीचा चांगला भाव देखील मिळणार आहे. सरकार आपल्या बाजूने आहे, आपला कोणताही तोटा करणार नाही.
- सुजित पाटील,
शेतकरी, नागावकवठे, तासगाव, सांगली.


आमच्याकडे साधारण २ महिन्यांपूर्वी मोजणी पूर्ण झाली. मोजणी होण्यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण करण्यात आला. सरकार आपल्याला फसवत असल्याची भावना निर्माण करण्यात आली होती. हे पाहता संपूर्ण गावाने प्रकल्पाला विरोध केला. सोलापूर संपलं की, पुढचं पहिलं गाव आमचं शेटफळ हे येतं होते. त्यामुळे जेव्हा प्रांत अधिकारी आमच्याकडे मोजणीसाठी आले, तेव्हा गावकऱ्यांनी एकमताने मोजणी नको असे सांगितले. त्यावेळी मात्र गावच्या विकासासाठी मी माझी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मी एकटाच त्यावेळी जमीन देण्यात तयार झालो. माझ्या शेतातून सुरुवात केली. मात्र, आमच्या जमिनी बागायती असल्याने आम्हाला चांगला मोबदला मिळावा इतकीच आमची मागणी होती. मोजणीला सुरुवात झाली, अशारितीने एक एक शेतकरी मोजणीसाठी सहमत होत आता १०० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे.
-सोमनाथ मोरे,
शेतकरी, शेटफळे, आटपाडी, सांगली


Powered By Sangraha 9.0