मुंबई : सृजनसंवाद प्रकाशन, प्रकाशित तथा सोनाली लोहार लिखित 'बाकी काही नाही' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि. ४ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या मेरी गोल्ड बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला. या समारंभाला ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, कवी व अभिनेते सौमित्र, अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री दिग्दर्शिका, लेखिका संपदा जोगळेकर कुलकर्णी, संपादक राजीव खांडेकर तथा मंदार फणसे, सृजनसंवाद प्रकाशनाचे संपादक व कवी गीतेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गीतेश शिंदे म्हणाले की सोनाली लोहार यांच्या कवितांमध्ये आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतो. कुठल्याही माणसाचा आतला आवाज हा त्याचा कवितासंग्रह असतो. याचसोबत त्यांनी सृजनसंवाद प्रकाशनाची शंभराव्या पुस्तकापर्यंतची वाटचाल विशद केली.
कवयित्री सोनाली लोहार आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कधी कुठल्या खोल वेदनेतून या कवितेला जन्म दिला हे सांगणं अवघड आहे. कितीही वेदना असली तरी त्या त्यावर मात करून जगायचं मात्र असतं. माझी विजीगिषा माझी कविताच आहे. माझ्या घरातला आरसा त्यात मी माझी कविता बघत असते. ही माझी कविता आयुष्यभर स्वच्छ दिसू दे. असे मत त्यांनी व्यक्त केले. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी कवयित्रीबरोबर असलेली आपली मैत्री, त्याचे बंध किती तरल आहेत ते सांगितलं. आपल्या मैत्रिणीच्या संवेदनशील मनातून हे पुस्तक आलेलं आहे असंही त्या म्हणाल्या. त्यांनी काही कवितांचे वाचनही केले व त्या उलगडून दाखवल्या. मंदार फणसे यांनी सोनाली लोहार यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले त्या कवयित्री आहेत त्याचबरोबर एक उत्तम संघटक आहेत. पत्रकार श्रीकांत बोजेवार म्हणाले की कविता लिहिणं आणि चांगली कविता लिहिणं यामध्ये फरक आहे. जी गोष्ट सर्वात सोपी वाटते ती सर्वात अवघड असते. खरी कविता ही आतून धडका देत असते, बाहेर येण्याचा प्रयत्न करते. काही जणांना तरी मातृत्वाचा अनुभव मिळावा म्हणून ईश्वराने कविता निर्मिती केली असावी. या सर्व कविता आजच्या काळातल्या आहेत. त्या सहज सोप्या वाटतात हीच त्यांची खरी ताकद आहे. काळ व क्रिएशन हातात हात घालून चालतात. आशय तोच असतो पण भाषा बदलते. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या आज मी या कवयित्रीकडे मैत्रिणीच्या नात्याने पाहते. आमची पंधरा वर्षांची मैत्री आहे. सोनाली लोहार यांच्या कवितांमध्ये सहजता आहे आणि तेच अधिक अवघड आहे. त्यांच्या कवितांमध्ये स्वाभाविकता व नैसर्गिकता आहे. ही आजच्या भाषेतील कविता आहे. या कवितांमध्ये विरहिणी व प्रेयसी दिसते. मीरा व राधा तरलपणे दिसतात. राजीव खांडेकर म्हणाले की एआयचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडणार आहे मात्र, सहज साधी कविता एआयला लिहीता येणार नाही. कवितेतील भावनात्मकता तरलता एआयद्वारा येऊ शकत नाही. अभिनेते व कवी सौमित्र सोनाली लोहार यांच्या कवितेविषयी बोलताना म्हणाले या कवितांमध्ये बऱ्याच ठिकाणी स्वतःच प्रतिबिंब दिसतं, आपण जे वाचतो त्यावरच नवीन काही घडवत जातो. या कवितांशी आपण स्वतःला जोडू शकतो.