ऑस्ट्रेलियात २०० हून अधिक विद्यार्थ्यांचे संस्कृतमध्ये वाल्मिकी रामायणाचे सादरीकरण

06 Oct 2025 19:10:25

मुंबई : व्हीएचपी (विश्व हिंदू परिषद) संस्कृत शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त सिडनी येथील द रीजन्सी फंक्शन सेंटरमध्ये एक इतिहास घडवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणाचे सर्व सहा कांड संस्कृत भाषेत नाट्यस्वरुपात सादर केले. १५ वर्षांखालील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय समर्पण आणि शिस्त दाखवत या कार्यक्रमात सहभाग घेतला. व्हीएचपी संस्कृत शाळेच्या प्रत्येक शाखेने एक कांड सादर केले आणि त्यामुळे रामायणाचा संपूर्ण व सुसंगत आविष्कार रंगमंचावर साकार झाला.

समर्पित समन्वयकांनी संवाद व संहितेची तयारी केली, तर अस्सल पोशाख आणि पारंपरिक वस्तूंनी या सादरीकरणाला सांस्कृतिक भव्यता प्राप्त झाली. या कार्यक्रमादरम्यान न्यू साउथ वेल्स शिक्षण विभाग, ऑस्ट्रेलियन सरकारने समुदायभाषा शाळांतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना गौरविले, ज्यामध्ये व्हीएचपी संस्कृत शाळेच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश होता. व्हीएचपी संस्कृत शाळेच्या समन्वयक आणि व्हीएचपी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस अकीला रामारथिनम यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अपार अभिमान व्यक्त केला. व्हीएचपी संस्कृत शाळा ही व्हीएचपी ऑस्ट्रेलियाची एक शाखा असून, न्यू साउथ वेल्स शिक्षण विभागाकडून संस्कृतसाठी समुदायभाषा शाळा म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त आहे. तिच्या ऑस्ट्रेलियामध्ये एकूण सहा केंद्रे कार्यरत आहेत.


Powered By Sangraha 9.0