मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच : प्रा.प्रवीण दवणे

06 Oct 2025 18:35:36

कल्याण : मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच, पण तिचे आकलन झाले नाही तर घराघरात असलेल्या मराठी भाषारुपी अमृताच्या रसग्रहणापासून आपण दूर रहाल असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी केले.

अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून नुकतेच महापालिकेच्या आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिरात "मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रा. दवणे यांनी आपल्या व्याख्यानाची सुरवात अभिजात मराठी भाषेच्या सुरेख काव्याने करीत त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच उपस्थित श्रोतृवर्गाची मने जिंकली.याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल‍, अतिरिक्त आयुक्त योगेशे गोडसे, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके, भाजपा माजी नगरसेविका खुशबु चौधरी, महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी तसेच कला रसिक व साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रा. दवणे म्हणाले, मराठी भाषा ही आपली वडिलोपार्जित ठेव आहे, तिची जपणूक आपण केली पाहिजे. एखाद्या प्राचिन वाड्याची डागडुजी केली नाही तर तो ढासळतो. आपल्या पूर्वजांनी उभारलेला उत्कृष्ठ मराठी भाषारुपी वाडा वंशजांनी सांभाळला नाही, तर मराठी भाषेचे सौंदर्य देखील लोप पावेल. आपली अप्रतिम मराठी भाषा केवळ नदीचा ओहळ म्हणून शिल्लक राहू नये, असे सांगत त्यांनी संत ज्ञानेश्वरांपासून संत सावता माळी या संत परंपरेतील तत्कालीन भक्ती गीतांतील शब्द रचना सुलभ ,ओघवत्या मराठी भाषेत अलवार उलगडून दाखविली. तसेच मराठी भाषा ही अमृताचा घडा आहे, ती ग्रहण करताना जेव्हा कानाचा डोळा होतो, तेव्हा भाषेकडे कानाडोळा होत नाही. "अभिजात मराठी भाषा दिन" या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणजे आपले मराठीपण जपणे होय. पुढच्या पिढीचे प्रश्न हे धनाचे नसतील, तर मनाचे असतील, त्यासाठी मराठी भाषेशी जवळीक केली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.‌

आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले, आपली भाषा विकसित होण्यावर भर द्यावा. साहित्य, पुस्तक वाचन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. समाजात वाचन प्रवृत्ती वाढली पाहिजे, तसेच "वाचन ही संस्कृती व्हावी" या साठीच आठवड्यात एक दिवस वाचन दिवस म्हणून आपण निश्चित करुया, असेही ते पुढे म्हणाले.

मराठीतील प्रख्यात कवयित्री शांता शेळके व इतर कवींच्या काव्य पंक्ती उद्धृत‍ करीत, सर्वांनी वाचनाचा परीघ समृध्द करावा, असे विचार महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

गतवर्षी मराठी भाषेला शासनाकडून अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे विचार महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले.

या कार्यक्रमाचे खुमासदार सुत्र संचालन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी केले.


Powered By Sangraha 9.0