मुंबई : निसर्ग सौंदर्य आणि आरोग्यदायी हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग शहरामध्ये, रविवार ५ ऑक्टोबरला झालेल्या अविरत पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. जे दार्जिलिंगच्या या दशकातील सर्वात मोठे भूस्खलन मानले जात आहे ज्यामध्ये लहान मुलांसह आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज दर्शवल्यावर काही कालावधीतच सुरू झालेल्या या पावसाने दार्जिलिंगला झोडपून काढले. काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, घरे वाहून गेली, रस्ते बंद झाले आणि दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसात शेकडो पर्यटक अडकले आहेत .
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक फटका हा मिरिक भागाला बसला आहे.एकट्या दार्जिलिंग जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू सर्वात जास्त प्रभावित झालेल्या मिरिकमध्ये झाला आहे. इतर सात जणांचे मृत्यू हे जोरेबंगलो, सुकिया पोखरी आणि सदर पोलिस स्टेशन परिसरात झाले आहेत. शिवाय नागरकाटा (जलपाईगुडी जिल्हा) येथे एका वेगळ्या मोहिमेत ढिगाऱ्यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले.
तसे पाहिले तर, दार्जिलिंग भूतकाळात अनेक नैसर्गिक आपत्तींना बळी पडले आहे. १८९९, १९३४, १९५०, १९६८, १९७५, १९८०, १९९१ आणि अलीकडेच २०११ आणि २०१५ मध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. १९६८ मध्ये विनाशकारी पूर आला ज्यामध्ये हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ५ ऑक्टोबरला घडलेली ही घटना.
आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे बचावकार्य अद्याप सुरूच आहे. २४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि हजारो पर्यटक डोंगराळ भागात अडकले आहेत.